मुंबई : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्यामध्ये मुंबईतील ताज हॉटेलमध्ये भेट झाली. दोन्ही नेत्यांमध्ये जवळपास तासभरापासून चर्चा सुरू आहे. स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीच्या तोंडावर झालेली ही भेट महाराष्ट्राच्या राजकारणात चर्चेचा विषय ठरत आहे. एकीकडे राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे यांच्यामध्ये युतीची चर्चा सुरू असतानाच दुसरीकडे आज फडणवीस यांनी मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांची भेट घेतल्यामुळे अनेकांच्या भुवया उंचवल्या आहेत.
आज सकाळी राज ठाकरे ताज लँडस हॉटेलमध्ये पोहोचले. त्यानंतर 20 मिनिटांत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे या हॉटेलमध्ये पोहोचले. सुरुवातीला हे दोन्ही नेते एकाच हॉटेलमध्ये एकत्र येणे योगायोग आहे का, अशी चर्चा सुरु होती. मात्र, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या आजच्या नियोजित कार्यक्रमात कुठेही ताज लँडस हॉटेलचा समावेश नव्हता. मात्र, राज ठाकरे या हॉटेलमध्ये आल्यानंतरच देवेंद्र फडणवीस वाट वाकडी करुन याठिकाणी का पोहोचले, असा सवाल आता विचारला जात आहे. देवेंद्र फडणवीस आणि राज ठाकरे यांची ही भेट निर्णायक ठरणार का, याकडे आता राजकीय वर्तुळाचे लक्ष लागले आहे.