
बेळगाव : सतत पडणाऱ्या संततधार पावसामुळे शहरात सर्वत्र पाणीच पाणी झाले आहे. त्याचबरोबर परिसरातील नदी-नाले दुथडी भरून वाहत असून बेळगाव शहराची तहान भागवणारे राकसकोप जलाशय देखील पूर्ण क्षमतेने भरले आहे. त्यामुळे राकसकोप धरणाचे एक दार उघडण्यात आले आहे. राकसकोप धरण पूर्ण क्षमतेने भरल्यामुळे बेळगाव शहरावरील पाणीटंचाईचे संकट दूर झाल्याची भावना शहरवासीयातून व्यक्त होत आहे. राकसकोप धरणाला मिळणाऱ्या नदी- नाल्यांच्या पाणी पातळीत मोठी वाढ झाली असल्यामुळे या पाण्याचा प्रवाह क्षेत्रात येऊन मिळत आहे. त्यामुळे राकसकोप धरण पाणी पातळीत बुधवारी सकाळी 2471.70 फुटावर होती त्यानंतर दिवसभरात झालेल्या पावसामुळे ही पाणी पातळी एक फुटाणे वाढली. राकसकोप जलाशय पूर्ण क्षमतेने भरले असून जलाशय व्यवस्थापनाने संभाव्य धोका काढण्यासाठी बुधवारी सायंकाळी जलाशयाच्या वेस्ट वेअर च्या सहा दरवाजांपैकी दोन क्रमांकाचा दरवाजा उघडला. जलाशयात पाण्याचा प्रवाह वाढल्याने राकसकोप धरणाचे इतर दरवाजे देखील उघडण्यात येणार आहेत राकसकोप धरणाची क्षमता ही 2475 फूट आहे. सतत कोसळणाऱ्या पावसामुळे येत्या दोन दिवसात राकसकोप जलाशय पूर्ण क्षमतेने भरेल असा अंदाज वर्तवण्यात येत आहे. बुधवारी सकाळी राकसकोप क्षेत्र परिसरात 41.5 मि.मी. पावसाची नोंद झाली असून यावर्षी एकंदर पाऊस 126.9 मि.मी. इतका झाला आहे. जून महिन्यात केवळ पंधरा दिवसातच 900 मि.मी. पावसाची नोंद झाली असून आतापर्यंत वीस फूट पाणी पातळीत वाढ झाली आहे. मागील वर्षी याच दिवशी राकसकोप पाणलोट क्षेत्रात पाणी पातळी 24 फुटावर स्थिर होती. पाऊस देखील केवळ 429 मि.मी. इतकाच झाला होता. मागील वर्षी संपूर्ण जून महिन्यात केवळ 248 मि.मी. पाऊस पडला होता. राकसकोप जलाशय पूर्ण क्षमतेने भरल्यामुळे जलाशयाचे दरवाजे दोन फुट उचलण्यात आले असून हे पाणी मार्कंडेय या नदीतून प्रवाहित झाले आहे. आगामी काळात पाऊस वाढल्यास जलाशयातील पाण्याचा विसर्ग वाढविण्यात येणार असल्याने मार्कंडेय नदीपात्राशेजारील शेतकऱ्यांनी सतर्क राहण्याची गरज व्यक्त होत आहे.

Belgaum Varta Belgaum Varta