
बेळगाव : आनंद नगर वडगाव दुसरा क्रॉस येथील रस्त्यावरील पथदीप मागील दोन महिन्यांपासून बंद पडल्यामुळे या रस्त्यावर अंधाराचे साम्राज्य पसरले आहे. या रस्त्यावरून लहान मुले व ज्येष्ठ नागरिकांसह वाहनचालकांची मोठी वर्दळ असते. या रस्त्यावर भटक्या कुत्र्यांचा वावर असल्यामुळे अंधारात या रस्त्यावरून ये-जा करणे जिकिरीचे बनले आहे. स्थानिक नागरिकांनी या संदर्भात इ स्मार्ट एलईडी स्ट्रीट लाईट कंट्रोल रूमला संपर्क साधला असता 48 तासात पथदीप दुरुस्ती करण्यात येईल असे सांगण्यात आले. मात्र मागील 10 दिवसांपासून नागरिकांच्या या तक्रारीवर कंट्रोल रूमच्या कर्मचाऱ्यांनी जाणूनबुजून दुर्लक्ष केल्याचा आरोप या भागातील नागरिकांनी केला आहे. महानगरपालिकेने तात्काळ या समस्येकडे लक्ष घालून पथदीप दुरुस्ती करावी. त्याचप्रमाणे वडगाव स्मशान रस्त्यावरील पथदीप देखील बंद पडले असून त्यामुळे या भागातील नागरिकांची गैरसोय होत आहे.

Belgaum Varta Belgaum Varta