
बेळगाव : अखिल कर्नाटक माजी सैनिक संघटनेच्या बेळगाव जिल्हा शाखेतर्फे येत्या शनिवार दि. 26 जुलै 2025 रोजी कारगिल आणि ऑपरेशन सिंदूर विजयोत्सव भव्य प्रमाणात साजरे केले जाणार असून यानिमित्ताने मोठी बाईक रॅली देखील काढली जाणार आहे, अशी माहिती बेळगाव जिल्हा माजी सैनिक संघटनेचे अध्यक्ष बसप्पा तरवार यांनी दिली.

शहरातील कन्नड साहित्य भवन येथे आज सोमवारी सकाळी आयोजित पत्रकार परिषदेमध्ये ते बोलत होते. माजी सैनिक संघटनेचे अध्यक्ष तरवार यांनी दिलेल्या माहितीनुसार, अखिल कर्नाटक माजी सैनिक संघटनेच्या बेळगाव जिल्हा शाखेतर्फे येत्या शनिवार दि. 26 जुलै 2025 रोजी सकाळी 11 वाजता 26वा कारगिल आणि ऑपरेशन सिंदूर विजयोत्सव कार्यक्रम -2025 साजरा केला जाणार आहे. नेहरूनगर बेळगाव येथील के.पी.टी.सी.एल. समुदाय भवन येथे या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. सदर सदर कार्यक्रमाआधी सकाळी 10:30 वाजता न्यू गांधीनगर येथील एससी मोटर्स जवळील संघटनेच्या कार्यालयापासून शहरातील प्रमुख मार्गावरून बाईक रॅली काढण्यात येणार आहे.

26वा कारगिल आणि ऑपरेशन सिंदूर विजयोत्सव कार्यक्रमास प्रमुख पाहुणे म्हणून राज्याचे सार्वजनिक बांधकाम व बेळगाव जिल्हा पालकमंत्री सतीश जारकीहोळी उपस्थित राहणार असून त्यांच्या हस्ते कार्यक्रमाचे उद्घाटन केले जाणार आहे. याप्रसंगी महिला व बालकल्याण खात्याच्या मंत्री लक्ष्मी हेब्बाळकर व अन्य मान्यवर उपस्थित राहणार आहेत. सदर कार्यक्रमाचे औचित्य साधून कारगिल युद्धात सहभागी झालेले वीर युद्धे आणि युद्धामध्ये शहीद झालेल्या योद्धांच्या वीर पत्नींचा त्याचप्रमाणे आदर्श माजी सैनिक, ज्येष्ठ वयोवृद्ध माजी सैनिक आणि एस.एस.एल.सी. व पदवी पूर्व द्वितीय वर्षाच्या परीक्षेत 90 टक्के गुणांसह गुणवत्तेत उत्तीर्ण झालेल्या आजी-माजी सैनिकांच्या मुलांचा सत्कार केला जाणार आहे. या खेरीज अन्य कार्यक्रमही होणार आहेत.
पत्रकार परिषदेस बेळगाव जिल्हा माजी सैनिक संघटनेचे अध्यक्ष बसप्पा तरवार यांच्या समवेत उपाध्यक्ष विरूपाक्ष तिळगंजे, कार्याध्यक्ष रुद्रगौडा पाटील, सचिव केंपन्ना लक्कन्नावर, अजित वाळके, दोड्डप्पा हंजी, शंकर शिंदे आदी उपस्थित होते.

Belgaum Varta Belgaum Varta