
बेळगाव : बेळगाव शहरातील तिसऱ्या रेल्वे गेटजवळ वाढलेल्या खड्ड्यांविरोधात येथील नागरिकांनी रांगोळी काढून अभिनव पद्धतीने निषेध व्यक्त केला. येत्या दोन-तीन दिवसांत रस्त्याची दुरुस्ती न झाल्यास तीव्र आंदोलन छेडण्याचा इशाराही त्यांनी दिला आहे.
बेळगावच्या चौथ्या रेल्वे गेटवर भुयारी मार्ग बांधकामामुळे वाहतूक वळवण्यात आली आहे. यामुळे तिसऱ्या रेल्वे गेटवर वाहतुकीची कोंडी वाढून रस्ता पूर्णपणे खराब झाला आहे आणि येथे खड्ड्यांचे साम्राज्य निर्माण झाले आहे. नागरिकांना होणाऱ्या या त्रासाकडे जिल्हा प्रशासनाचे लक्ष वेधण्यासाठी हे रांगोळी आंदोलन करण्यात आले.

माजी नगरसेवक विनायक गुंजटकर यांनी सांगितले की, “चौथ्या गेटवरील भुयारी मार्गाच्या कामामुळे तेथील वाहतूक बंद केली आहे, परिणामी तिसऱ्या गेटवर वाहतूक वाढली आहे. तिसऱ्या रेल्वे ओव्हरब्रिजवरील रस्ता खराब झाला असून, सर्वत्र खड्डे पडले आहेत. पावसाळ्यात या खड्ड्यांमध्ये पाणी साचून नागरिकांना ये-जा करताना प्रचंड त्रास होत आहे.” त्यांनी पुढे सांगितले, “जर येत्या दोन-तीन दिवसांत या रस्त्याची दुरुस्ती केली नाही, तर तीव्र आंदोलन हाती घेण्यात येईल. यात काही अनुचित प्रकार घडल्यास, त्याची सर्वस्वी जबाबदारी जिल्हा प्रशासनाची असेल.”

उद्यमबागला दररोज या मार्गावरून जाणाऱ्या नागरिकांनी मागणी केली आहे की, चौथ्या गेटवर भुयारी मार्गाचे काम सुरू आहे, परंतु यामुळे तिसऱ्या रेल्वे गेटवर वाहतूक कोंडी वाढून रस्ता खराब झाला आहे. संबंधित विभागाने या रस्त्याची तातडीने दुरुस्ती करून होणारे अपघात टाळावेत असेही यावेळी सुचविण्यात आले. या आंदोलनात विविध सामाजिक कार्यकर्ते आणि नागरिक सहभागी झाले होते.
Belgaum Varta Belgaum Varta