
बेळगाव : बेळगाव ग्रामीण परिसरातील बेनकनहळ्ळी गावातील काही हिंदू युवकांनी एकत्र येऊन प्रथमच कावड यात्रेचे आयोजन केले. श्रावण महिन्याच्या पहिल्या सोमवारी पाच पवित्र नद्यांचे जल एकत्र करून खानापूर येथील मलप्रभा नदीचे जल घेऊन, पारंपरिक पद्धतीने गंगा पूजन आणि आरती करून कावड यात्रेला प्रारंभ करण्यात आला.

ही कावड यात्रा खानापूर-बेळगाव मार्गे सुरु होऊन मिलिटरी महादेव मंदिर (कॅम्प), हिंडलगा गणपती मंदिर, सुळगा मारुती मंदिर व उचगाव येथील मार्कंडेय नदीवरील गणेश मंदिर इत्यादी धार्मिक स्थळांवर जाऊन वैजनाथ मंदिर येथे जल अभिषेक करून समारोप करण्यात आला.
यात्रेच्या प्रारंभी मलप्रभा नदी जल पूजन व कावड पूजन पंडित ओगले यांच्या हस्ते करण्यात आले. पिरनवाडी मारुती मंदिर येथे नगरसेवक श्री रमेश मैलागोळ व कुशल अंबोळकर यांच्या हस्ते कावड पूजन पार पडले.
या यात्रेमध्ये श्रीराम सेना उत्तर कर्नाटक प्रमुख श्री रविकुमार कोकितकर, कल्लापा पाटील, प्रदीप मुंगळीकर, परशुराम पाटील, मारुती काटकर, गोविंद पाटील आदींनी सहभाग घेतला. यात्रेच्या आयोजनामध्ये मयांक मुंगारे, लक्ष्मण पाटील, नितीन बेनके, बाळू मुंगळीकर, भारत पिसाळे, श्रीधर बेनके, यल्लापा जाधव, महेश मडिवाळ, महेश हेब्बाळकर, ओमकार गोडसे आणि संतोष जाधव यांना कावड घेण्याचा मान मिळाला.
कावड यात्रेत भाविकांचा उत्स्फूर्त सहभाग लाभला असून, संपूर्ण यात्रा भक्तिमय वातावरणात उत्साहाने पार पडली. यात्रेच्या यशस्वी आयोजनाबद्दल सहभागी युवकांचे व गावकऱ्यांचे सर्वत्र कौतुक होत आहे.
Belgaum Varta Belgaum Varta