बेळगाव : धनपत राय, ज्यांना संपूर्ण भारत “प्रेमचंद” या नावाने ओळखतो, त्यांना “उपन्यास सम्राट” तसेच “कलम का सिपाही” असे गौरवोपाधीने संबोधले जाते. प्रेमचंद यांनी केवळ हिंदी कथांना वास्तवाचा आधार दिला नाही, तर स्वतःच्या जीवनानुभवातून त्या कथांना एका नव्या सर्जनशीलतेने समृद्ध केले. पुढे ते हिंदी आणि उर्दू साहित्याचे सर्वाधिक लोकप्रिय कादंबरीकार, कथाकार आणि विचारवंत बनले.
प्रेमचंद हे केवळ लेखक नव्हते, तर ते पुरोगामी विचारांचे प्रचारक होते. त्यांच्या साहित्याने हिंदी साहित्यास एक नवी दिशा दिली. असे मत मैसूर येथील मैसूर विद्यापीठाच्या हिंदी विभागाच्या अध्यक्षा प्रो. डॉ. प्रतिभा मुदलियार यांनी व्यक्त केले. त्या लिंगराज पदवी आणि पदवीपूर्व कला व वाणिज्य महाविद्यालयाच्या हिंदी विभागाच्या संयुक्त विद्यमानाने आयोजित प्रेमचंद जयंती समारोहाच्या प्रमुख पाहुण्या म्हणून बोलत होत्या.
हा समारोह लिंगराज महाविद्यालयाच्या मध्यवर्ती सभागृहात मोठ्या उत्साहात पार पडला. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी लिंगराज महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. एच. एस. मेलीनमनी होते. यावेळी लिंगराज पीयू कॉलेजच्या प्राचार्या श्रीमती गिरिजा हिरेमठ, बुक लव्हर्स क्लबचे उपाध्यक्ष श्री. किशोर काकडे, हिंदी विभागाच्या डॉ. कलावती निंबाळकर, प्रा. सीमा जनवाडे व हिंदी विभागाचे प्रमुख प्रा. अर्जुन कांबळे व्यासपीठावर उपस्थित होते.
कार्यक्रमाची सुरुवात कु. प्रज्वल नेर्लेकर व कु. पृथ्वी नेर्लेकर यांच्या स्वागतगीत व प्रार्थनागीताने झाली. त्यानंतर प्रेमचंद यांच्या प्रतिमेचे पूजन व त्यांच्या जीवनावर आधारित भित्तीपत्रकाचे उद्घाटन प्रमुख पाहुण्यांच्या हस्ते करण्यात आले. प्रमुख पाहुण्यांचे स्वागत प्राचार्यांच्या हस्ते शाल, रोपटे व पुस्तक देऊन करण्यात आले. यानंतर प्रा. अर्जुन कांबळे यांनी स्वागत भाषण केले.
या प्रसंगी बुक लव्हर्स क्लब, बेळगावचे उपाध्यक्ष श्री. किशोर काकडे म्हणाले की, “प्रेमचंद यांच्या कथा मानवाला जगण्याचा मंत्र देतात. आधुनिक युवा पिढीने त्यांच्या साहित्याचे वाचन करणे आवश्यक आहे. प्रेमचंद यांनी साहित्याला सामाजिक परिवर्तनाचे साधन बनवले असून त्यांच्या साहित्याची लोकप्रियता आजही कायम आहे.”
कार्यक्रमात कु. फैजीन किल्लेदार आणि कु. हरिप्रिया शनाय यांनी प्रेमचंद लिखित कथांचे प्रभावी सादरीकरण केले. सूत्रसंचालन कु. सुहानी कदम व कु. नक्षत्रा कुलकर्णी यांनी केले. प्रमुख पाहुण्यांचा परिचय कु. नक्षत्रा कुलकर्णी यांनी करून दिला, तर आभार प्रदर्शन कु. संगीता एडके यांनी केले.
कार्यक्रमाला प्रा. रवींद्र बडिगेर, प्रा. सतीश रेवण्णावर, प्रा. बाहुबली देसाई, डॉ. शशिकांत कोन्नूर, प्रा. लक्ष्मी बिरादार तसेच विद्यार्थी आणि विद्यार्थिनी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
या कार्यक्रमाच्या यशस्वितेसाठी डॉ. कलावती निंबाळकर, प्रो. सीमा जनवाडे, प्रा. सूरज हत्तलगी, कु. एंड्रिन रोनाल्डो, कु. मेघा राव, कु. अभिषेक गाडीवड्डर, कु. कुमकुम राजपुरोहित आणि कु. सतीश कार्डी यांनी विशेष परिश्रम घेतले.

Belgaum Varta Belgaum Varta