बेळगाव : बेळगाव शहरात अमली पदार्थ विरोधी मोहीम तीव्र करत बेळगाव पोलिसांनी अमली पदार्थांविरोधात मोठी कारवाई केली आहे. या कारवाईदरम्यान हेरॉईन व गांजाची तस्करी करणाऱ्या एकूण चार आरोपींना अटक करण्यात आले असून त्यांच्याकडून 1 लाख 72 हजार रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. पोलिसांच्या या कारवाईमुळे शहरातील अमली पदार्थाच्या रॅकेटला मोठा धक्का बसला आहे. बेळगाव शहरात अमली पदार्थ विकले जात असल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती त्यानुसार बेळगाव पोलिसांनी दोन ठिकाणी स्वतंत्रपणे कारवाई करत अमली पदार्थ विकणाऱ्या चार आरोपींना मुद्देमालासह अटक केली आहे. शहरातील महाद्वार रोड वरील संभाजी गल्लीमध्ये पोलिसांनी छापा टाकत हेरॉईन विकणाऱ्या वैभव कुरणे व ओमकार जोशी या दोघांना अटक केली आहे. त्यांच्याकडून 24.81 ग्राम हेरॉईन जप्त करण्यात आले आहे. त्याचप्रमाणे मच्छे येथील साई कॉलनीमध्ये अतिफ मुल्ला व सैफ अली माडीवाले या दोघांना गांजा विकत असताना ग्रामीण पोलीस पथकाने अटक केली आहे. त्यांच्याकडून 40 हजार रुपये किमतीचे एक किलो 366 ग्रॅम गांजा रोख 1000 रुपये एक दुचाकी, आयफोन असा एकूण 1 लाख 72 हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. बेळगाव पोलीस आयुक्त आणि उपायुक्त आणि मार्केट पोलीस आणि ग्रामीण पोलिसांच्या कामगिरीचे विशेष कौतुक केले आहे.

Belgaum Varta Belgaum Varta