
बेळगाव : बेळगाव शहरात दिवसेंदिवस वाहतूक कोंडी वाढत चालली आहे. ही वाहतूक कोंडी सोडवण्यासाठी सार्वजनिक सुरक्षेला प्राधान्य देत शहरातील विविध शाळा व महाविद्यालयांच्या प्राचार्य व प्रशासकांची एक बैठक सोमवार दिनांक 4 ऑगस्ट रोजी झालेल्या घेण्यात आली.
या बैठकीदरम्यान बोलताना पोलीस आयुक्त भूषण बोरसे म्हणाले की, अल्पवयीन विद्यार्थ्याकडून दुचाकी व चार चाकी वाहनांचा वापर वाढत आहे ही बाब चिंताजनक आहे. मोटार वाहन कायदा कलम चारनुसार वाहन चालवण्यासाठी 18 वर्षे पूर्ण होणे आवश्यक आहे. त्याचप्रमाणे कलम 119 नुसार जर अल्पवयीन वाहन चालकांकडून वाहतुकीचे नियम भंग झाल्यास त्यांच्या पालकांना व वाहन मालकाला जबाबदार धरले जाते. यामध्ये तीन वर्षाची कैद किंवा 25 हजाराचा दंड अशी कायद्यात तरतूद आहे. त्यामुळे पालकांनी अल्पवयीन मुलांच्या हातात वाहन देऊ नये जर अल्पवयीन मुलांकडे वाहन आढळल्यास त्याला सर्वस्वी जबाबदार त्यांच्या पालकांना धरण्यात येईल असा कडक इशारा पोलीस आयुक्त भूषण बोरसे यांनी दिला.
बेळगाव शहरात अकरावी आणि बारावीच्या वर्गात शिकणाऱ्या महाविद्यालयीन मुलांच्या हातात सहसा वाहने दिसतात. ही मुले स्वतःच्या दुचाकीने महाविद्यालयाला येतात. अल्पवयीन विद्यार्थ्यांनी महाविद्यालयांना वाहने घेऊन आल्यास दुचाकीस्वारासह पालक व दुचाकी मालक यांच्यावर कडक कारवाई करण्यात येईल त्यामुळे शाळा प्रशासकाने व महाविद्यालयीन प्राचार्यांनी याबाबत महाविद्यालयांमध्ये जनजागृती करावी. महाविद्यालय परिसरात विद्यार्थी रस्त्यावरच वाहने पार्किंग करतात त्यामुळे रहदारीला अडथळा निर्माण होतो व रस्त्यावर गर्दी होते त्यामुळे विद्यार्थ्यांना संस्थेच्या आवारातील पार्किंगमध्येच गाड्या पार्क करण्याची सक्ती करण्यात यावी. जेणेकरून रस्त्यावर गर्दी कमी होईल. ज्या शिक्षण संस्थांकडे स्वतःची जागा नाही त्यांनी जवळच्या मोकळ्या जागा वापऱ्याव्यात अशी सूचना देखील पोलीस आयुक्तांनी सूचना केली. त्यासाठी जमीन मालकांशी चर्चा देखील सुरू आहे असे सांगितले. काही शैक्षणिक संस्थांकडे स्वतःची जागा असून देखील विद्यार्थी रस्त्यावर गाड्या उभ्या करत असल्याचे दिसून आले आहे. त्यामुळे रस्त्यावरील गर्दी टाळण्यासाठी विद्यार्थ्यांनी महाविद्यालयीन आवाराच्या पार्किंगमध्येच आपली वाहने पार्क करावीत व त्या संदर्भात विद्यार्थ्यांना त्या त्या संस्थांनी मार्गदर्शन करावे अशी विनंती यावेळी करण्यात आली आहे.

Belgaum Varta Belgaum Varta