
बेळगाव : राज्य परिवहन विभागाच्या संपामुळे बेळगाव येथील नागरिकांची एकच तारांबळ उडाली. राज्यभरात परिवहन मंडळाच्या कर्मचाऱ्यांचा संप सुरू आहे. याचा परिणाम बेळगावमध्ये देखील पाहायला मिळाला. बेळगाव विभागातून दररोज 600 पेक्षा जास्त बसेस धावत असतात तर चिकोडी विभागातून एकूण 668 बस दिवसाला चालू असतात. बेळगाव आणि चिकोडी विभागातून एकूण 4300 हून अधिक कर्मचारी सेवा देत आहेत परंतु आज परिवहन मंडळाच्या कर्मचाऱ्यांच्या संपामुळे एकही बस डेपोतून बाहेर पडली नाही. लांब पल्ल्याच्या बस चालू असल्या तरी स्थानिक व सेवा पूर्णपणे ठप्प झाली आहे. परिणामी प्रवाशांना मोठ्या गैरसोयींना सामोरे जावे लागत आहे. महाविद्यालयीन विद्यार्थ्यांना देखील या संपाचा मोठा फटका बसला. विद्यार्थ्यांना शाळा, कॉलेजमध्ये वेळेत पोहोचण्यास अडचणी निर्माण झाल्या. बस स्थानकात प्रवाशांची गैरसोय होऊ नये, कोणत्याही प्रकारचा अनुचित प्रकार घडू नये यासाठी संपाच्या पार्श्वभूमीवर बेळगाव मार्केट पोलीस स्थानकाचे पोलीस पथक बंदोबस्तासाठी तैनात होते.
बस स्थानकात कोणताही अनुचित प्रकार घडू नये कायदा व सुव्यवस्था अबाधित राहावी यासाठी पोलीस प्रशासन सज्ज आहे असे पोलीस आयुक्त भूषण बोरसे यांनी सांगितले. परिवहन मंडळाच्या संपामुळे सर्वसामान्य नागरिकांना व विद्यार्थ्यांना मोठ्या समस्यांना सामोरे जावे लागले आहे.

Belgaum Varta Belgaum Varta