
बेळगाव : कर्नाटक – महाराष्ट्र सीमाप्रश्नासंदर्भात दोन्ही राज्यांच्या सीमेवर शांतता प्रस्थापित करण्यासाठी कर्नाटक आणि महाराष्ट्र राज्यांच्या मुख्यमंत्र्यांची संयुक्तिक बैठक बोलवण्यात यावी अशी मागणी केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांना तज्ञ कमिटी अध्यक्ष खासदार धैर्यशील माने यांनी पत्राद्वारे केली आहे.
सीमाभागात सध्या सुरू असलेल्या कन्नडसक्तीच्या पार्श्वभूमीवर कोल्हापूरचे हातकणंगलेचे खासदार धैर्यशील माने यांनी केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांना पत्राद्वारे कळविले आहे की, बेळगावसह संपूर्ण सीमाभागात सध्या कन्नडसक्ती तीव्र केली जात आहे. सीमा प्रश्न 2004 पासून आजतागायत सुप्रीम कोर्टात प्रलंबित आहे. भाषिक अल्पसंख्यांक कायद्यानुसार सीमाभागात त्रिसूत्रीय धोरण अवलंबणे अपेक्षित आहे. मात्र कर्नाटक सरकार भाषिक अल्पसंख्यांक कायद्याची पायमल्ली करीत मराठी भाषिकांवर अन्याय करत आहे. यासाठी केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी मध्यस्थी करून कर्नाटक आणि महाराष्ट्र या दोन्ही राज्यांच्या मुख्यमंत्र्यांची संयुक्तिक बैठक बोलवावी अशी विनंती या पत्राद्वारे करण्यात आली आहे. चार वर्षांपूर्वी देखील केंद्रीय गृहमंत्र्यांनी दिल्ली येथे दोन्ही राज्यांच्या मुख्यमंत्र्यांची बैठक आयोजित केली होती त्या बैठकीत समन्वयमंत्र्यांची देखील नियुक्ती करण्यात आली होती. मात्र त्यानंतर याबाबत समन्वयमंत्र्यांची एकदाही बैठक घेण्यात आलेली नाही. सीमा प्रश्न खटला सर्वोच्च न्यायालयात प्रलंबित आहे. 2014 नंतर सीमाप्रश्नी एकदाही सुनावणी झालेली नाही ज्याप्रमाणे केंद्र सरकारने आसाम आणि मेघालय या दोन राज्यांचा प्रश्न सोडविला त्याच धर्तीवर सीमाप्रश्नाबाबत कोर्टाबाहेर चर्चा करून हा प्रश्न सोडवण्यासाठी प्रयत्न व्हावे असे देखील त्यांनी या पत्रामध्ये नमूद केले आहे. 28 जुलै 2025 रोजी खासदार धैर्यशील माने यांनी केंद्रीय गृहमंत्र्यांना सीमाप्रश्नाबाबतचे सविस्तर पत्र लिहिले आहे . 11 ऑगस्ट रोजी बेळगाव येथे कन्नडसक्ती विरोधी होणाऱ्या मोर्चाला बेळगाव पोलीस प्रशासनाने परवानगी नाकारल्यानंतर धैर्यशील माने यांनी केंद्रीय मंत्री अमित शहा यांना लिहिलेल्या पत्राला विशेष महत्त्व प्राप्त झाले आहे.
Belgaum Varta Belgaum Varta