
संजीवनी फौंडेशनच्या वतीने ज्योती कॉलेजमधील विद्यार्थ्यांना मार्गदर्शन
बेळगाव : मेहनत आत्मविश्वास आणि प्रामाणिकपणा हाच उज्ज्वल भविष्याकडे घेऊन जाणारा मार्ग असून काळजात स्वप्न आणि मनगटात धमक असेल तर आपण कोणत्याही स्वप्नाला सत्याकडे घेऊन जाऊ शकता असे युवा व्याख्याते प्रा. युवराज पाटील यांनी सांगितले.
संजिवनी फौंडेशन आयोजीत उद्याच्या उज्ज्वल भविष्यासाठी या कार्यक्रमात ते विद्यार्थ्यांना उद्देशून बोलत होते.
या मार्गदर्शन शिबिराच्या सुरुवातीला उपस्थित मान्यवरांचे स्वागत संजीवनी पोतदार यांनी केले तर प्रास्ताविक करताना मदन बामणे यांनी संजीवीनी फौंडेशनच्या माध्यमातून युवकांच्या व्यक्तित्व विकासासाठी काम करीत असते त्याचाच एक भाग हा कार्यक्रम घेतल्याचे सांगितले. प्रमुख पाहुण्यांचा परिचय अंकिता राजोरे यांनी करून दिला.
यावेळी व्यासपीठावर संस्थापिका डॉ. सविता देगीनाळ, ज्योती कॉलेजचे प्राचार्य एस एस पाटील आणि चेअरमन मदन बामणे उपस्थित होते.
मदन बामणे यांनी युवराज पाटील आणि एस एस पाटील यांचा भेटवस्तू आणि गुलाबपुष्प देऊन सन्मान केला.
पुढे बोलताना प्रा. पाटील यांनी आपल्या मानवी मेंदूची क्षमता चाळीस हजार जीबीची असून आम्ही त्याचा वापर एक टक्का सुद्धा करीत नाही, आपल्या क्षमतांचा वापर करून आपल्या आयुष्याची वाटचाल करा. आपल्यात वजीर होण्याची ताकत असून मन मनगट आणि मेंदू आपल्या ताब्यात ठेवल्यास यश नक्की मिळेल. यासाठी संघर्ष करावा लागेल, कोणत्याही क्षणी खचून जाऊ नका त्यासाठी अपयश पचविण्याची ताकत तुमच्यात असली पाहिजे. आपल्याला मिळालेल्या स्वातंत्र्याचा वापर स्वैराचारासाठी करणार की स्वतःचे अस्तित्व घडविण्यासाठी असा प्रश्नही त्यांनी विद्यार्थ्यांना विचारला.
शेवटी अकरावी बारावी ही दोन वर्षे खूप महत्त्वाची असून जीव तोडून मेहनत करा आणि तुमच्या भविष्यासाठी जे आईवडील काबाडकष्ट करीत आहेत त्यांचे कष्ट विसरू नका. सोशल मीडियाचा वापर करताना त्याची सत्यता पारखा असा सल्लाही त्यांनी दिला.
युवराज पाटील यांच्या प्रेरणादायी व्याख्यानामुळे उपस्थित अनेक विद्यार्थ्यांचे डोळे पाणावले.
शेवटी प्राचार्य पाटील यांनी आपले मनोगत व्यक्त केले. शेवटी आभार पद्मा औषेकर यांनी मानले. कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी प्राध्यापक महेश जाधव यांचे विशेष सहकार्य लाभले.
Belgaum Varta Belgaum Varta