नार्वेकर गल्ली बेळगाव येथील घटना
बेळगाव : नार्वेकर गल्ली बेळगाव येथे घरात लागलेल्या आगीत सामाजिक कार्यकर्त्या सुप्रिया बैलूर यांचा दुर्दैवी मृत्यू झाल्याची घटना घडली. बुधवारी रात्री 10.30 च्या सुमारास लागलेल्या आगीत सुप्रिया बैलूर (वय 78) राहणार नार्वेकर गल्ली यांचा होरपळून मृत्यू झाला आहे. बुधवारी रात्री साडेदहाच्या सुमारास अचानक धूर येण्यास सुरुवात झाली. ही बाब स्थानिक नागरिकांच्या निदर्शनास येताच लोकांनी एकच गर्दी केली. काही लोक मदतीसाठी पुढे सरसावले. तोपर्यंत सुप्रिया बैलूर या गंभीररित्या भाजून जखमी झाल्या होत्या.
घटनेची माहिती मिळताच खडेबाजार पोलीस तसेच अग्निशामक दलाचे जवान घटनास्थळी तातडीने दाखल झाले. अग्निशामक दलाच्या जवानांनी वेळीच आग आटोक्यात आणली व घरात आगीच्या भक्षस्थानी अडकलेल्या सुप्रिया बैलूर यांना बाहेर काढून तात्काळ जिल्हा रुग्णालयात दाखल केले परंतु उपचार सुरू असतानाच त्यांचा मृत्यू झाला. रात्री उशिरापर्यंत पोलीस स्थानकात घटनेची नोंद झाली नव्हती तरीदेखील खडेबाजार पोलिस स्थानकाचे पोलीस उपनिरीक्षक व सहाय्यक पोलिसांनी घटनास्थळी धाव घेऊन मदत केली. अद्याप आगीचे नेमके कारण समजू शकले नाही. प्रथमदर्शनी शॉर्टसर्किटमुळे ही दुर्घटना घडल्याचा अंदाज व्यक्त करण्यात येत आहे.
सुप्रिया बैलूर या वैश्यवाणी समाजातील प्रतिष्ठित नागरिक होत्या. वैश्यवाणी महिला समाजाच्या विविध पदांची जबाबदारी त्यांनी सांभाळली होती. त्यांच्या दुर्दैवी मृत्यूमुळे हळहळ व्यक्त होत आहे.
Belgaum Varta Belgaum Varta