बेळगाव : येत्या 22 सप्टेंबरपासून ते 7 ऑक्टोबरपर्यंत कर्नाटक राज्यामध्ये मागासवर्गीय आयोगातर्फे जातीनिहाय जनगणना होणार आहे त्यामध्ये सामाजिक आणि शैक्षणिक सर्वेक्षण केले जात आहे. मराठा समाजाच्या सर्वांगीण विकासासाठी या सर्वेक्षणामध्ये मराठा समाजाने सहभागी होऊन नमुना फॉर्ममध्ये धर्माच्या कॉलममध्ये “हिंदू”, जातीच्या कॉलममध्ये “मराठा”, पोटजातीच्या कॉलममध्ये “कुणबी” तसेच मातृभाषेच्या कॉलममध्ये “मराठी” अशी नोंद करावी, असे आवाहन विधान परिषद सदस्य तसेच मराठा समाजाचे नेते एम. जी. मुळे यांनी केले आहे.
राज्यात सुरू होणाऱ्या जातीनिहाय जनगणनेच्या पार्श्वभूमीवर सकल मराठा समाज आणि क्षत्रिय मराठा परिषद बेळगावतर्फे शहरांमध्ये आज मंगळवारी आयोजित पत्रकार परिषदेमध्ये ते बोलत होते. यावेळी विधान परिषद सदस्य मुळे म्हणाले की, राज्यात 22 तारखेपासून 7 ऑक्टोबरपर्यंत सामाजिक आणि शैक्षणिक सर्वेक्षण केला जाणार आहे. या सर्वेक्षणामध्ये आमच्या मराठा समाज बांधवांनी सहभागी होऊन नोंदणी करावी जेणेकरून मराठा समाजाची राज्यात संख्या किती आहे हे स्पष्ट होईल. त्यामुळे सरकारला देखील भविष्यात मराठा समाजाला सोयी, सवलती देणे सोपे होईल. त्यामुळे जातीनिहाय जनगणनी नोंदणी करणे आवश्यक आहे. या जातीनिहाय जनगणनेमध्ये सामाजिक आणि शैक्षणिक सर्वेक्षण केला जाणार आहे या सर्वेक्षणामुळे समाज अध्याप किती मागासलेला आहे किंवा किती प्रगत आहे हे स्पष्ट होईल यामध्ये जाती संदर्भातील चार कॉलम महत्त्वाचे आहेत परंतु इतर 60 प्रश्न देखील आहेत. सामाजिक प्रश्न अंतर्गत तुमचे लग्न कसे होते, पूजाअर्चा कशी होते, समाजामध्ये तुमचा दर्जा काय आहे, या सर्व गोष्टी तपासल्या जातात. घरांचे सर्वेक्षण केले जाते. घर कसे आहे, पत्र्याचे आहे की झोपडी, सिमेंट काँक्रीटचे आहे, घरात नळ, पाणी, शौचालय इतर मूलभूत नागरिक सुविधा आहेत का? सुशिक्षितता पडताळली जाते. शैक्षणिक दर्जा पडताळला जातो, तुम्ही शहरी भागात की ग्रामीण भागात याची देखील पडताळणी होणार. तुमचा नोकरी, उद्योग यावरून आर्थिक बाजूंची देखील पडताळणी केली जाणार आहे. यामध्ये तुम्ही शेती करता की नोकरी करता, उद्योग धंदे करता की सरकारी नोकरी आहे, खाजगी नोकरी, बेरोजगारी या सर्वांचा तपशील नोंदणी करण्यात येणार आहे. घरात चारचाकी, मोटरसायकल, किंवा सायकल आहे का? या सर्व गोष्टी तपासल्या जातील. या सर्व साठ प्रश्नांच्या माध्यमातून पडताळणी करून गुण नोंदणी केली जाते. ही नोंदणी 3:2:1 या प्रमाणात केली जाते. त्यापैकी तीन सामाजिक स्थिती, दोन शैक्षणिक स्थिती आणि एक आर्थिक स्थितीशी संबंधित आहे. त्यामुळे समस्त मराठा समाज बंधु भगिनींनी येत्या सर्वेक्षणामध्ये सहभागी होऊन जातीनिहाय जनगणना करून घ्यावी असे आवाहन यावेळी करण्यात आले.
या जातीनिहाय जनगणनेमुळे सरकारला मराठा समाजाची जनसंख्या किती आहे हे समजेल. प्रत्येकाने सर्व प्रश्नांची उत्तरे खरे लिहिली तर निश्चितच आपला समाज मागासवर्गीयांमध्ये मोडू शकतो याचा लाभ सर्वांना होऊ शकतो, असे मुळे यांनी सांगितले.
पत्रकार परिषदेस खानापूरचे आमदार विठ्ठलराव हलगेकर,।माजी आमदार ॲड. अनिल बेनके, किरण जाधव, माजी जिल्हा पंचायत सदस्य रमेश गोरल, नागेश देसाई, धनंजय जाधव, युवराज जाधव, वैभव क्षत्रिय मराठा परिषदेच्या श्यामसुंदर गायकवाड, मराठा समाजाचे स्थानिक नेते उपस्थित होते.
Belgaum Varta Belgaum Varta