
बेळगाव : शहरातील वाढत्या गुन्हेगारीला आळा घालण्यासाठी पोलीस दलाने कंबर कसली असून सणासुदीच्या काळात गुन्हेगारांवर अंकुश ठेवण्यासाठी बेळगाव पोलिसांनी मोठी कारवाई केली आहे. एकाच वेळी विविध गुन्ह्यात सहभाग असलेल्या गुन्हेगारांना पकडून लाखोंचा ऐवज जप्त करण्यात आला आहे.
रायबाग तालुक्यातील निडगुंदी गावात गांजाची शेती करणाऱ्या एकाला रायबाग पोलिसांनी अटक केली असून यामध्ये 440 किलो गांजा जप्त केला आहे. या गांजाची किंमत सुमारे 20 ते 25 लाख रुपये इतकी असल्याची माहिती समोर आली आहे. आरोपी शिगडी माळाप्पा हिरेकोडी याने आपल्या वडिलांच्या शेतात गांजाची लागवड केली होती. याप्रकरणी पोलिसांनी आरोपीला अटक केली असून अथणी पोलीस स्थानकाचे डीएसपी पुढील चौकशी करीत आहेत. सध्या आरोपीची न्यायालयीन कोठडीत रवानगी करण्यात आली आहे.
पोलिसांनी बस स्थानकावर एका महिलेची सोनसाखळी चोरण्याचा प्रयत्न करणाऱ्या दोन आरोपींना पाठलाग करून ताब्यात घेतले असून त्यांच्याकडून 2 लाख 75 हजार रुपये किमतीची सोनसाखळी जप्त करण्यात आली आहे. त्याचप्रमाणे कागवाड पोलीस स्थानकाच्या हद्दीत चोरीला गेलेले 145 ग्रॅम सोने जप्त करण्यात आले असून अन्य एका चोरी प्रकरणातही अथणी पोलिसांनी एका आरोपीला देखील अटक करून त्याच्याकडील सोने जप्त केले आहे.
पैसे दुप्पट करण्याच्या आमिषाने फसवणूक करणाऱ्या टोळीचा कारनामा देखील पोलीस प्रशासनाने उघड केला आहे. या टोळीने एका व्यक्तीला 17 लाख रुपयांना फसवले होते. तक्रारदाराच्या तक्रारीवरून पोलिसांनी अवघ्या 24 तासात चार आरोपींना अटक केली असून त्यांच्याकडून फसवणुकीचे 17 लाख रुपये रोख रक्कम आणि एक कार जप्त केली आहे.
पोलिसांच्या या सर्व कारवाईमुळे गुन्हेगारीला आळा घालण्यासाठी पोलीस प्रशासन सतर्क असल्याचे दिसून येत आहे. पोलिसांच्या या कार्याचे सर्वत्र कौतुक होत आहे.

Belgaum Varta Belgaum Varta