
बेळगाव : बेनकनहळ्ळी ग्रामपंचायत क्षेत्रातील सरस्वती नगर पाईपलाईन रस्त्याच्या ठिकाणी मोठ्या प्रमाणावर प्लास्टिक, कचरा टाकला जात आहे. त्यामुळे परिसरात दुर्गंधीचे साम्राज्य पसरले आहे. या रस्त्या शेजारी अनधिकृत पावभाजी, ऑम्लेट पावच्या गाड्या लागलेल्या असतात. या ठिकाणी खवय्यांची गर्दी नेहमीच होत असते. रस्त्याच्या कडेला या गाड्यांवरील टाकाऊ पदार्थ, मोठ्या प्रमाणात घरगुती कचरा टाकला जात आहे. टाकाऊ वस्तु, शिळे अन्न, कचरा प्लास्टिक पिशव्यांमध्ये बांधून तेथे टाकल्या जात असल्यामुळे रस्त्याच्या कडेला कचऱ्याचा मोठा ढीग साचला आहे. वेळेवर कचऱ्याची उचल होत नसल्यामुळे रस्त्यालगत टाकलेल्या कचऱ्यातील उकिरड्यावर कुत्री व डुकरे अन्नाच्या शोधात फिरत असतात. या रस्त्यावरून ये -जा करणारे नागरिक महिला व आबालवृद्धांना भटक्या कुत्र्यांपासून धोका निर्माण झाला आहे. त्याचबरोबर रस्त्याशेजारी टाकलेल्या कचऱ्याची दुर्गंधी परिसरात पसरल्यामुळे तिथून ये-जा करताना नाकाला रुमाल लावून जावे लागत आहे. संबंधित खात्याने रस्त्याच्या कडेला साचलेला कचरा त्वरित उचलण्याचे आदेश द्यावेत, अशी जोरदार मागणी सरस्वती नगर परिसरातील नागरिक करीत आहेत.
Belgaum Varta Belgaum Varta