

रायबाग : मुलगी प्रियकरासोबत पळून गेल्याच्या रागातून वडिलांनी चक्क मुलीचा श्राद्ध घातल्याची घटना रायबाग तालुक्यातील नागराळ गावात घडली आहे. नागराळ येथील सुश्मिता शिवगौडा पाटील नावाची एक तरुणी त्याच गावातील विठ्ठल बस्तावडे नावाच्या पुरुषासोबत पळून गेली होती. मुलीच्या या कृत्यामुळे घराण्याचा नावलौकिक डागळला या रागापोटी वडील शिवगौडा पाटील यांनी मुलीची तिथी आयोजित करून कुटुंबीयांसह पै पाहुणे व गावकऱ्यांना मुलीच्या नावाने श्राद्धाचे जेवण वाढून आपला मुलीबद्दलचा राग व्यक्त केला. इतकेच करून पित्याचा राग शांत झाला नाही तर त्यांनी गावात ठिकठिकाणी श्रद्धांजली फलके लावून मुलीला श्रद्धांजली अर्पण केली. रायबाग पोलीस स्थानकाच्या हद्दीत ही घटना घडली आहे. या घटनेची पंचक्रोशीत जोरदार चर्चा सुरू आहे.

Belgaum Varta Belgaum Varta