

बेळगाव : स्वामी विवेकानंदानी भारत भ्रमण करताना बेळगावला भेट दिली होती. या घटनेला १३३ वर्षे पूर्ण झाल्याबद्दल रामकृष्ण मिशन आश्रमतर्फे विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते.
स्वामी विवेकानंदानी बेळगावातील रिसालदार गल्लीतील भाते यांच्या निवासस्थानी तीन दिवस वास्तव्य केले होते. आता भाते यांच्या निवासस्थानी स्वामी विवेकानंद स्मारक उभारण्यात आले आहे.स्वामीजीनी वापरलेल्या आरसा, खाट, काठी आणि अन्य वस्तू तेथे जतन करून ठेवण्यात आल्या आहेत. विवेकानंदाच्या जीवनावरील चित्रांचे प्रदर्शन देखील मांडण्यात आले आहे.

या स्वामी विवेकानंद स्मारकातच गुरुवारी सकाळपासून विविध कार्यक्रम आयोजित करण्यात आले होते. सकाळी पूजा आणि अन्य धार्मिक विधी पार पडल्यावर दुपारी महाप्रसाद वितरित करण्यात आला. हजारो लोकांनी महाप्रसादाचा लाभ घेतला. सायंकाळी भजन आणि कीर्तन झाले. पुण्याचे दामोदर रामदासी यांनी सादर केलेल्या मर्यादा पुरुषोत्तम श्रीराम या एकपात्री प्रयोगाने कार्यक्रमाची सांगता झाली.


Belgaum Varta Belgaum Varta