
बेळगाव : कार्तिकी एकादशीनिमित्त पंढरपूरला जाणाऱ्या वारकऱ्यांसाठी नैऋत्य रेल्वेने विशेष आनंदाची बातमी दिली आहे. हुबळी–पंढरपूर या मार्गावर दि. 29 ऑक्टोबर ते 3 नोव्हेंबर या कालावधीत विशेष रेल्वे फेऱ्यांची घोषणा करण्यात आली आहे. त्यामुळे बेळगावसह खानापूर, लोंढा आणि परिसरातील भाविकांना मोठा दिलासा मिळाला आहे.
या रेल्वेला स्लीपरसह जनरल डबे जोडण्यात आले असून वारकऱ्यांचा प्रवास अधिक सुखकर आणि सोयीस्कर होणार आहे.
रेल्वेचा वेळापत्रक पुढीलप्रमाणे
दि. 29, 30, 31 ऑक्टोबर तसेच 1, 2, 3 नोव्हेंबर रोजी पहाटे 5.10 वा. हुबळी येथून रेल्वे सुटणार असून सायंकाळी 4.00 वा. पंढरपूर येथे पोहोचेल. त्याच दिवशी सायंकाळी 6.00 वा. पंढरपूरहून परतीचा प्रवास सुरू होईल आणि रेल्वे दुसऱ्या दिवशी पहाटे 4.00 वा. हुबळीला पोहोचेल.
थांबे
धारवाड, अळणावर, लोंढा, खानापूर, देसूर, बेळगाव, पाच्छापूर, गोकाक रोड, घटप्रभा, चिकोडी रोड, रायबाग, चिंचली, कुडची, उगार खुर्द, शेडबाळ, विजयनगर, मिरज, आरग, धळगाव, जत रोड, वसूड, सांगोला.
वारकऱ्यांच्या मागणीला यश
बेळगावसह आसपासच्या वारकरी संघटनांनी पंढरपूरसाठी विशेष रेल्वे चालविण्याची मागणी काही दिवसांपूर्वी केली होती. वारकऱ्यांनी खासदार जगदीश शेट्टर यांच्याकडे विनंती केली होती, तर जोयडा येथील वारकऱ्यांनी आमदार आर. व्ही. देशपांडे यांच्या माध्यमातून रेल्वेमंत्र्यांकडे निवेदन सादर केले होते. या सातत्यपूर्ण प्रयत्नांना अखेर यश मिळाले असून वारकऱ्यांमध्ये आनंदाचे वातावरण निर्माण झाले आहे.
Belgaum Varta Belgaum Varta