
बेळगाव : राज्याच्या राजकारणात शक्तिशाली मानला जाणाऱ्या बेळगाव जिल्ह्यात आता मोठे राजकीय बदल पहावयास मिळणार आहे. 18 मतदारसंघ असलेल्या बेळगाव जिल्ह्यात आता 24 मतदारसंघ होणार असल्याची शक्यता वर्तवली जात आहे. मतदारसंघाच्या पुनर्रचनेचे काम आता अंतिम टप्प्यात आले असून 2028 च्या विधानसभा निवडणुकीत जिल्ह्यात मोठे राजकीय बदल होणार असल्याचे दिसून येत आहे.
कर्नाटक राज्याच्या राजकारणात बेळगाव जिल्हा अत्यंत प्रभावशाली मानला जातो. हा जिल्हा केवळ मतदारसंघाच्या संख्यांच्या बाबतीतच नाही तर जिल्ह्यातील राजकारणाच्या ताकतीमुळे देखील चर्चेत असतो. बेळगाव जिल्ह्यातील राजकीय घडामोडींनी राज्यातील राजकारणात उलथापालथ हे अनेक वेळा सिद्ध झाले आहे, त्यामुळे कोणताही पक्ष बेळगाव जिल्ह्याला हलक्यात घेत नाही.
अधिकृत सूत्रांच्या माहितीनुसार येत्या विधानसभा निवडणुकीत बेळगाव जिल्ह्यात सहा मतदार संघ वाढणार असून एकंदरीत अठरा मतदारसंघावरून 24 मतदार संघ होणार आहेत. या वाढलेल्या मतदार संघामुळे राजकारणात मोठा बदल होणार यात तीळमात्र शंका नाही. जिल्ह्यात नवीन सहा मतदारसंघ निर्माण झाले तर विद्यमान सर्व अठरा मतदारसंघाच्या कार्यक्षेत्रात बरेच बदल होणार आहेत. विद्यमान आमदारांनाही त्यांना त्यांचे मतदारसंघ गमवावे लागतील तर नवीन मतदारांना जुळवून घ्यावे लागेल. शिवाय महिला आरक्षणामुळे काहीना त्यांचे मतदारसंघ देखील गमवावे लागू शकतात. 2028 च्या निवडणुकीत महिला आरक्षण लागू होणार असल्याने महिलांना आठ जागा राखीव मिळतील त्यामुळे महिला आरक्षण लागू झाल्यास महिलांना संधी मिळेल. आगामी काळात होणाऱ्या राजकीय घडामोडींमुळे जिल्ह्यात बरेच बदल पाहायला मिळणार आहेत. हे केवळ जिल्ह्यापुरते मर्यादित नसून राज्य आणि राष्ट्रीय पातळीवरील मतदारसंघांची संख्या देखील बदलणार आहे. त्याचप्रमाणे महिला मोठ्या संख्येने विधानसभेत प्रवेश करतील. पुढील निवडणुका महिला नेतृत्वासाठी एक संधी आणि आव्हान असण्याची शक्यता आहे. मतदारसंघाची संख्या 18 वरून 24 वर आल्यास बेळगाव जिल्ह्यात 2028 च्या विधानसभा निवडणुकीत मोठे बदल अपेक्षित आहेत.
Belgaum Varta Belgaum Varta