
बेळगाव : मागील तीन-चार महिन्यांपासून बेळगाव शहर व परिसरात कन्नड रक्षण वेदिकेच्या कार्यकर्त्यांकडून बेळगाव शहरातील दुकाने त्याचप्रमाणे व्यावसायिक आस्थापनांवरील मराठी व इंग्रजी भाषेतील फलक हटवण्याचे किंवा काळा रंग लावून मिटविण्याचे प्रकार वाढले आहेत. विशेष म्हणजे असे प्रकार घडत असताना पोलीस प्रशासन बघ्याची भूमिका घेत आहे. या बेकायदेशीर कारवायांवर तात्काळ प्रतिबंध घालावा. या मागणीसाठी मध्यवर्ती महाराष्ट्र एकीकरण समितीच्या वतीने बेळगाव शहर पोलीस आयुक्तांना निवेदन देण्यात आले.
बेळगाव शहरात काही दिवसांपासून कन्नड संघटनांचे कार्यकर्ते स्वतः बेकायदेशीरपणे व्यापारी संकुलनावरील तसेच दुकानांवरील फलकांवरचा मराठी व इंग्रजी भाषेत लिहिलेला मजकूर काळा रंग लावून मिटवण्याचा प्रयत्न करीत आहेत. यांच्या या कृतीमुळे व्यापारी वर्गाला नाहक त्रास सहन करावा लागत आहे. बेळगाव शहरातील व्यापारी परवाने घेऊनच कायदेशीररित्या आपले व्यापार चालवीत आहेत. भारतीय राज्यघटनेने त्यांना व्यापार करण्याचा स्वतंत्र अधिकार दिला आहे तरी देखील कन्नड संघटनांचे कार्यकर्ते कायदा हातात घेऊन व्यापाऱ्यांवर दादागिरी करीत आहेत त्यांच्या या दादागिरीला प्रशासनाने आळा घालावा, अशी मागणी करणारे निवेदन आज मध्यवर्ती महाराष्ट्र एकीकरण समितीतर्फे पोलीस आयुक्तांना देण्यात आले आहे. या निवेदनात म्हटले आहे की, कन्नड भाषा सर्वांगीण विकास अधिनियम 2022 नुसार सरकारी आणि स्थानिक संस्थांच्या फलकांवर कन्नड भाषेचा वापर अनिवार्य करण्यात आलेला असला तरी इंग्रजी किंवा मराठी भाषेचा वापर करण्यास कायद्यात कोठेही मनाई केलेली नाही. 60% कन्नड भाषा तर 40% इतर भाषेत फलकावर मजकूर लिहिण्याचा कायदा कर्नाटक सरकारने केलेला आहे. संपूर्ण सीमाभागात स्वातंत्र्यपूर्व काळापासून मराठी भाषेतूनच व्यवहार केले जातात. मराठी भाषा हीच व्यवहारिक भाषा म्हणून आजही वापरली जाते त्यामुळे मराठी भाषेतील फलक काढून टाकण्याचा प्रकार म्हणजे स्थानिक मराठी भाषिकांच्या भावना दुखावणारी घटना असून भाषिक अल्पसंख्यांक आयोगाने दिलेल्या हक्काची देखील पायमल्ली करण्यासारखेच आहे असे देखील या निवेदनात नमूद करण्यात आले आहे.
या निवेदनावर मध्यवर्ती महाराष्ट्र एकीकरण समितीचे कार्याध्यक्ष मनोहर किणेकर, सरचिटणीस मालोजीराव अष्टेकर, खजिनदार प्रकाश मरगाळे, खानापूर तालुका महाराष्ट्र एकीकरण समिती अध्यक्ष गोपाळराव देसाई, ऍड. एम. जी. पाटील यांनी देखील स्वाक्षऱ्या केल्या आहेत. यावेळी आर. एम. चौगुले, युवा समिती अध्यक्ष अंकुश केसरकर, श्रीकांत कदम, रणजीत चव्हाण-पाटील, नेताजी जाधव, रणजीत हाळवाणाचे, दता उघाडे, अनिल पाटील, सचिन केळवेकर, बी. डी. मोहनगेकर, उमेश पाटील, किरण हुद्दार, विनायक कावळे यांच्यासह कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.
Belgaum Varta Belgaum Varta