
बेळगाव : बेळगावात बसून अमेरिकेतील नागरिकांना फ्रॉड कॉलद्वारे पैशांची फसवणूक करणाऱ्या एका आंतरराष्ट्रीय कॉल सेंटरच्या रॅकेटचा बेळगाव शहर पोलिसांनी पर्दाफाश केला आहे. शहरातून तब्बल ३३ जणांना ताब्यात घेऊन पोलिसांनी या मोठ्या आंतरराष्ट्रीय फसवणुकीच्या प्रकरणाचा छडा लावला आहे.
आज बेळगाव येथे पत्रकार परिषद घेऊन बेळगाव शहर पोलीस आयुक्त भूषण बोरसे यांनी ही माहिती दिली. शहरात एक कॉल सेंटर कार्यरत असल्याची विश्वसनीय माहिती आणि एका निनावी अर्जाच्या आधारे ही कारवाई करण्यात आली. डीसीपी नारायण बरमनी यांच्या नेतृत्वाखाली एसीपी रघु, माळमारुतीचे सीपीआय गड्डेकर, एपीएमसीचे पीआय उस्मान औटी आणि कर्मचाऱ्यांच्या पथकाने ही मोहीम राबवली. पोलिसांच्या पथकाने शहरातील बॉक्साइट रोडवरील कुमार हॉल येथे सुरू असलेल्या कॉल सेंटरवर छापा टाकला. त्यावेळी तेथे आंतरराष्ट्रीय फसवणुकीचे कॉल सेंटर चालवले जात असल्याचे उघड झाले. या कारवाईत पोलिसांनी ३७ लॅपटॉप आणि ३७ मोबाईल फोन जप्त केले आहेत. विविध राज्यांमधील एकूण ३३ आरोपींना अटक करण्यात आली आहे. या कॉल सेंटरमध्ये अमेरिकेच्या नागरिकांची माहिती मिळवून त्यांची आर्थिक फसवणूक केली जात होती. “या रॅकेटचे प्रमुख सूत्रधार गुजरात आणि पश्चिम बंगालमध्ये असून, त्यांनाही अटक करण्यासाठी जाळे टाकण्यात आले आहे,” अशी माहिती पोलीस आयुक्तांनी दिली. याशिवाय, “डीजी यांना विनंती करून सीआयडीच्या मदतीने फसवणूक झालेल्या अमेरिकेतील नागरिकांशी संपर्क साधला जाईल. त्यांचे जबाब घेऊन दोषारोपपत्र दाखल करण्याची प्रक्रिया पूर्ण करण्यात येईल,” असेही त्यांनी स्पष्ट केले. या कॉल सेंटरमध्ये स्थानिक कोणीही काम करत नव्हते. बाहेरून आलेल्या कर्मचाऱ्यांना पगारासोबत राहण्याची सोयही पुरवली जात होती, तसेच मार्च महिन्यापासून या कर्मचाऱ्यांचे पगार सुरू झाल्याची माहिती आहे. या सर्व बाबींची कसून चौकशी केली जाईल, असेही बोरसे यांनी सांगितले.
Belgaum Varta Belgaum Varta