बेळगाव : विद्यार्थ्यांच्या जीवनातील एक महत्वाचा टप्पा असलेल्या एसएसएलसी परीक्षेला बेळगाव जिल्ह्यात सोमवारी प्रारंभ झाला. पहिल्या दिवशी प्रथम भाषा विषयाचा पेपर होता. विद्यार्थ्यांनी मोठ्या उत्साहाने परीक्षा केंद्रांवर येऊन परीक्षा दिली.
राज्यभरात सोमवारी एसएसएलसी परीक्षेला प्रारंभ झाला. राज्यात बेळगाव सर्वात मोठा जिल्हा आहे. भौगोलिकच नव्हे तर विद्यार्थी संख्येच्या दृष्टीनेही सर्वात मोठा असलेल्या बेळगाव जिल्ह्यात एसएसएलसी परीक्षा सुरळीत सुरु झाल्या. शिक्षण खात्याने जिल्हा प्रशासनाच्या मदतीने बेळगाव आणि चिक्कोडी शैक्षणिक जिल्ह्यात परीक्षेची सर्व तयारी पूर्ण केली आहे. जिल्ह्यात एकूण 78,587 परीक्षार्थी आहेत. त्यापैकी बेळगाव शैक्षणिक जिल्ह्यात 33,807 तर चिक्कोडी शैक्षणिक जिल्ह्यात 44,780 विद्यार्थी परीक्षा देत आहेत. जिल्ह्यात एकूण 296 परीक्षा केंद्रे स्थापन केली असून, एका वर्गखोलीत 20 विद्यार्थ्यांची आसन व्यवस्था केली आहे. कोविडचा कहर कमी झाला असला तरी कोविडचे सर्व नियम पाळून परीक्षा घेण्यात येत आहे. परीक्षा केंद्र परिसरातच सहाय्यक आरोग्य केंद्र स्थापन करण्यात आली आहेत. तेथे सर्दी, खोकला, ताप आलेल्या विद्यार्थ्यांची वेगळी व्यवस्था करण्यात आली आहे. प्रत्येक परीक्षा केंद्रावर कडेकोट पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला आहे. विद्यार्थ्यांनी मुक्तपणे परीक्षा द्यावी यासाठी पालक, शिक्षकांनी त्यांना धीर दिला आहे. या दरम्यान, हिजाब घालून परीक्षा देता येणार नसल्याचा स्पष्ट आदेश शिक्षण खात्याने बजावला आहे. सर्व विद्यार्थ्यांनी सक्तीने गणवेश घालूनच केंद्रांवर यावे अशी सूचना देण्यात आली आहे. बेळगावातील सर्व परीक्षा केंद्रांवर हिजाब काढून ठेवण्यासाठी वेगळ्या खोल्यांची व्यवस्था करण्यात आली आहे.
बेळगावातील सरदार्स हायस्कूल परीक्षा केंद्रावर आ. अनिल बेनके यांनी आगळावेगळा उपक्रम राबवत गुलाबाचे फुल देऊन परीक्षार्थींचे स्वागत केले. यावेळी बेळगाव शैक्षणिक जिल्ह्याचे डीडीपीआय बसवराज नलतवाड व अन्य उपस्थित होते.
दरम्यान, परीक्षा व्यवस्थेसंदर्भात माहिती देताना जिल्हाधिकारी महांतेश हिरेमठ म्हणाले, बेळगाव शैक्षणिक जिल्ह्यात एकूण 130 परीक्षा केंद्रे स्थापन करण्यात आली आहेत. 494 हायस्कूल्समध्ये एकूण 33,807 विद्यार्थी परीक्षा देत आहेत. परीक्षा केंद्राच्या 200 मीटर परिसरात जमावबंदी आदेश लागू केला आहे. परीक्षा केंद्र परिसरात 300 पोलिसांचा बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे. जिल्हा प्रशासनाने परीक्षेची सर्व तयारी पूर्ण केली असून, एकही विद्यार्थी परीक्षा देण्यापासून वंचित राहू नये याची दक्षता घेण्याच्या सूचना दिल्या आहेत. विद्यार्थ्यांनी उत्कृष्ट परीक्षा देऊन यश मिळवावे अशा शुभेच्छाही जिल्हाधिकार्यांनी दिल्या.
Check Also
१९२४च्या काँग्रेस अधिवेशनामुळे स्वातंत्र्य चळवळीला बळ मिळाले : प्राचार्य आनंद मेणसे
Spread the love बेळगाव अधिवेशनाला १०० वर्षे पूर्ण निमित्त अंनिसतर्फे विशेष व्याख्यान बेळगाव : हिंदू …