
बेळगाव : गुरुवर्य वि. गो. साठे मराठी प्रबोधिनीच्या वतीने रौप्य महोत्सवी मराठी बाल साहित्य संमेलन बालसाहित्यिक साहित्यप्रेमी आणि विद्यार्थ्यांच्या उपस्थितीत मोठ्या उत्साहात संपन्न झाले. बेळगावसह परिसरातील विद्यार्थ्यांनी या संमेलनात सहभाग घेतला होता. संमेलनाची सुरुवात विद्यानिकेतन शाळेच्या ग्रंथालयापासून निघालेल्या भव्य पुस्तक दिंडीने झाली. संमेलनाध्यक्ष प्राध्यापक मृणाल पर्वतकर यांनी विद्यानिकेतन शाळेतील महात्मा ज्योतिराव फुले यांच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण करून ग्रंथदिंडीला चालना दिली.

बाल साहित्यिकांनी तसेच विद्यार्थ्यांनी हातात सावित्रीबाई फुले, ज्योतिबा फुले, राजर्षी शाहू महाराज, राज्यघटना यांची प्रतिकात्मक पुस्तके घेऊन दिंडीत सहभाग नोंदविला. लेझीम पथकाने दिंडीचे आकर्षण आणखीनच वाढवले. मराठी विद्यानिकेतन पासून ते गोगटे रंगमंदिर पर्यंत ग्रंथदिंडी काढण्यात आली. यावेळी सीमा प्रश्नावर सादर झालेली कविता लक्षवेधी ठरली. या कवितेतून सीमा प्रश्नाची तळमळ पुढील पिढीच्या साहित्यातून तीव्रपणे उमटत असल्याचे दिसून आले.
“मराठी, बाल आणि साहित्य या तीन शब्दांची मैत्री करायला हवी प्रत्येक विद्यार्थ्यांमध्ये एक असामान्य कला असते ती पालकांनी आणि शिक्षकांनी ओळखणे गरजेचे आहे असे सांगत मृणाल पर्वतकर यांनी बाल साहित्याचे महत्त्व सांगितले.

चार सत्रात संमेलन पार पडले. ज्यामध्ये कथाकथनाचे पहिले सत्र होते. ज्यात निवडक कथाकारांनी आपल्या कथा सादर केल्या. यामध्ये ताराराणी हायस्कूल खानापूर येथील सही यादव, अथर्व गुरव (तडशीनहाळ), आराध्या शिवनगेकर (शिवनगे), मनाली बराटे (विद्यानिकेतन), समृद्धी सांबरेकर (महिला विद्यालय बेळगाव), श्रद्धा पाटील (सरकारी मराठी शाळा निलजी) या विद्यार्थ्यांनी कथाकथन सादर केले.
दुसऱ्या सत्रात कवी संमेलनाचे आयोजन करण्यात आले होते. कवी संमेलनात विद्यार्थ्यांनी स्वरचित कविता सादर करून रसिकांची मने जिंकली. सीमा प्रश्नाचा इतिहास आणि वर्तमान यावर आधारित कविता लक्षवेधी ठरली. बालसाहित्यिकांच्या कवितांनी रसिकांचे मन वेधून घेतले. या संमेलनामध्ये बेळगावसह चंदगड भागातील शालेय विद्यार्थ्यांनी आपला सहभाग नोंदविला होता. सध्याचे इंटरनेटच्या जगात विद्यार्थ्यांची साहित्यावरील पकड वाखाण्याजोगी ठरली.
साहित्य संमेलनाच्या तिसऱ्या सत्रात पुण्याच्या नाट्य कलाकारांनी मुलांच्या पोषण आहारासंबंधी जागरूकता निर्माण करणारे “मधली सुट्टी” हे बालनाट्य सादर केले.
आईच्या अंगाईतूनच मुलांना बालसाहित्याची पहिली ओळख होते. मराठी साहित्यात अविटगोडीची अजरामर गीते आहेत. मुलांशी पालकांनी आणि शिक्षकांनी संवाद साधायला हवा. मला मूल्य असलेले लिखाण म्हणजे साहित्य तर लहान मुलांना नजरेसमोर ठेवून लिहिलेले असते ते बालसाहित्य असे मत मृणाल पर्वतकर यांनी व्यक्त केले.
मराठी भाषा आणि संस्कृतीच्या संवर्धनासाठी वि.गो. साठे मराठी प्रबोधिनी आणि मराठी विद्यानिकेतन यांचे कार्य कौतुकास्पद आहे. मराठी साहित्य समृद्ध आहे मुलांमध्ये असलेले सुप्त कलागुण ओळखून त्यांना प्राधान्य देणे हे शिक्षक आणि पालकांचे कर्तव्य आहे तरच अशा कला बाहेर येणार त्यासाठी पालक आणि शिक्षकांनी मुलांच्या कलागुणांना वाव द्यावा असे आवाहन संमेलनाध्यक्ष मृणाल पर्वतकर यांनी केले.
यावेळी वि. गो. साठे प्रबोधिनी तर्फे मराठी व्याकरण आणि हस्ताक्षर स्पर्धा घेण्यात आल्या होत्या. त्यातील यशस्वी विद्यार्थ्यांना बक्षीस देऊन त्यांचा सन्मान करण्यात आला. संमेलनात सादर झालेल्या कथाकथनाला आणि कवितांना साहित्य प्रेमींनी भरभरून दात दिली. यावेळी जयंत नार्वेकर, सुभाष ओऊळकर त्यांच्यासह अनेक मान्यवर आणि साहित्यप्रेमी उपस्थित होते.
Belgaum Varta Belgaum Varta