
बेळगाव : भूतरामनहट्टी येथील राणी चन्नम्मा प्राणीसंग्रहालयातील एकूण 31 काळविटांच्या गूढ मृत्यूप्रकरणी सखोल चौकशी करण्याचे आदेश पालकमंत्री सतीश जारकीहोळी यांनी वन विभागाच्या डीएफओ आणि आरएफओ यांना दिले आहेत. कुवेंपू नगर येथील प्राणी संग्रहालय विकास प्राधिकरण अध्यक्ष रंगास्वामी यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या बैठकीत पालकमंत्री सतीश जारकीहोळी यांनी सांगितले की, राणी चन्नम्मा प्राणीसंग्रहालयात एकूण 31 काळविटांचा मृत्यू झाला आहे. या काळविटांच्या गूढ मृत्यूचे कारण शोधून काढण्याच्या सूचना वन अधिकाऱ्यांना देण्यात आल्या आहेत. राणी चन्नम्मा प्राणीसंग्रहालयातील 31 काळविटांचा मृत्यू ही अत्यंत दुर्दैवी बाब असल्याचे पालकमंत्र्यांनी यावेळी सांगितले. या गूढ मृत्यूचे कारण शोधण्यासाठी काळविटांचे संरक्षण करण्यासाठी अधिकाऱ्यांना त्वरित व्यापक उपायोजना करण्याचे निर्देश यावेळी त्यांनी दिले. प्राथमिक अहवालानुसार संसर्ग पसरल्यामुळे काळविटांचा इतक्या मोठ्या प्रमाणात मृत्यू झाला असावा असा संशय आहे. परंतु वनविभागाच्या कर्मचाऱ्यांच्या निष्काळजीपणाबाबतचे आरोप देखील होत आहेत. त्यामुळे 31 काळविटांच्या मृत्यूची सखोल चौकशी करून दोषींवर कठोर कारवाई केली जाईल. उर्वरित काळविटांच्या आरोग्याच्या दृष्टीने आवश्यक उपाययोजना तात्काळ राबविण्याचे निर्देश संबंधित अधिकाऱ्यांना या बैठकीत देण्यात आले आहेत. प्राथमिक प्राणी संग्रहालय विकास प्राधिकरणाचे अध्यक्ष रंगास्वामी, डीपीओ, आरपीओ व वन विभागाच्या संबंधित अधिकारी या बैठकीला उपस्थित होते.
Belgaum Varta Belgaum Varta