
बेळगाव : राणी चन्नम्मा प्राणी संग्रहालयातील एकापाठोपाठ एक 31 काळविटांचा संशयास्पद मृत्यू झाला होता. 13 नोव्हेंबरपासून प्राणी संग्रहालयातील काळवीट एका पाठोपाठ एक मृत्युमुखी पडल्याची घटना घडत होती. मृत काळविटांच्या मृतदेहाची तपासणी करून सादर केलेल्या प्राथमिक अहवालात सदर काळविटांचा मृत्यू ‘हेमोरेझीक सेप्टीसेमिया’ नावाच्या संसर्गजन्य विषाणूमुळे झाल्याचा संशय व्यक्त करण्यात आला आहे त्यामुळे खबरदारीचा उपाय म्हणून प्राणी संग्रहालयाच्या भूतरामहट्टीसह परिसरातील गावांना आपल्या पशु प्राण्यांची खबरदारी घेण्याची सूचना देण्यात आली आहे. सदर आजार संसर्गजन्य असून इतर शाकाहारी प्राण्यांना या रोगाची लागण होण्याची दाट शक्यता आहे. त्यामुळे हा आजार रोखण्यासाठी प्राणी संग्रहालयाच्या परिसरातील गावांमध्ये आवश्यक खबरदारीच्या उपाययोजना करण्याची सूचना बेळगावच्या उपवन संरक्षण अधिकाऱ्यांनी जिल्हा पशु संगोपन व पशुवैद्यकीय सेवा खात्याच्या उपसंचालकांना केली आहे. बेळगाव जवळील भूतरामहट्टी येथील राणी चन्नम्मा प्राणीसंग्रहालयातील तब्बल 31 काळविटांच्या अचानक झालेल्या मृत्यूने राज्यभरात खळबळ उडाली आहे. प्राणी संग्रहालयाच्या आसपास असणाऱ्या गावातील पशुपालकांनी देखील खबरदारी घेण्याची सूचना पशुवैद्यकीय खात्याने केली आहे.
Belgaum Varta Belgaum Varta