

बेळगाव : आपणही समाजाचा एक भाग आहोत. आपल्याला देखील सर्वसामान्य नागरिकांप्रमाणे समाजात समानतेने वागणूक मिळावी. सरकारी योजनांचा लाभ आपल्याला देखील मिळावा यासाठी संविधान दिनाच्या निमित्ताने बेळगाव जिल्ह्यातील तृतीयपंथीयांनी ह्यूमॅनिटी फाउंडेशनच्या नेतृत्वाखाली बुधवारी सकाळी राणी कित्तूर चन्नम्मा सर्कल येथील कन्नड साहित्य भवन येथून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर मार्गे कुमार गंधर्व रंगमंदिरापर्यंत तृतीयपंथीयांच्या रॅलीचे आयोजन केले होते. या रॅलीमध्ये बेळगाव जिल्ह्यातील बहुतांश तृतीयपंथीय सहभागी झाले होते. कन्नड साहित्य भवन समोरील रस्त्यावर सामाजिक कार्यकर्ते संतोष दरेकर व अवधूत तुडवेकर यांच्या हस्ते तृतीयपंथीयांच्या मिरवणुकीचे उद्घाटन करण्यात आले. या मिरवणुकीत बेळगाव जिल्ह्यातील जवळपास 2500 पेक्षा जास्त तृतीयपंथीयांनी उत्स्फूर्त सहभाग दर्शविला होता.
यावेळी बोलताना ह्युमॅनिटी फाउंडेशनच्या जिल्हा प्रवक्त्या किरण बेरी म्हणाले की, आज संविधान दिनानिमित्त बेळगाव जिल्ह्यातील तृतीयपंथी यांनी आपल्या अभिमानाचे प्रदर्शन घडविले आहे. आज बेळगाव जिल्ह्यातील 2500 पेक्षा जास्त तृतीयपंथीय बेळगाव शहरात एकत्र हजर आहेत. इतक्या मोठ्या संख्येने तृतीयपंथीय एकत्र येण्या मागचा उद्देश म्हणजे आमच्या सांस्कृतिक कार्यक्रमाला उपस्थित राहणारे जिल्हाधिकाऱ्यांना आमच्या तृतीयपंथीयांच्या संख्येची जाणीव करून देणे हा आहे. जेणेकरून जिल्हाधिकाऱ्यांना समजेल की, जिल्ह्यात तृतीयपंथीय किती मोठ्या संख्येने आहेत व ते येत्या काळात तृतीयपंथीयांसाठी शासकीय योजनांचा लाभ मिळवून देतील कारण आज देखील समाजात तृतीयपंथीयांना स्थान नाही. त्यांना कोणत्याही सोयी सुविधा उपलब्ध नाहीत. शासकीय योजना तृतीयपंथीयांना मिळत नाहीत. समाजात त्यांची आज देखील अहवेलना होते. बहुतांश तृतीयपंथीयांना आपले जीवन कष्टाचे जगावे लागत आहे त्यामुळे तृतीयपंथीयांची संख्या लक्षात घेत जिल्हाधिकाऱ्यांनी भविष्यात तृतीयपंथीयांसाठी शासकीय योजना उपलब्ध करून द्याव्यात हा एकमेव उद्देश असल्याचे त्यांनी सांगितले. याबाबत पुढे बोलताना त्या म्हणाल्या की, तृतीयपंथीयांना सरकारी योजनांचा लाभ मिळावा त्यांना शासकीय घरे मिळावे त्यांच्यासाठी लिंगत्व लैंगिक अल्पसंख्यांक संघटनेच्या माध्यमातून गेल्या 18 वर्षांपासून आम्ही लढा देत आहोत. मात्र अद्यापही शासन दरबारी त्याची दखल घेण्यात आलेली नाही. एकंदर तृतीयपंथीयांना सरकारी योजनांचा लाभ मिळणे आवश्यक आहे असे देखील किरण बेरी यांनी यावेळी सांगितले.
कन्नड साहित्य भवन येथून सुरू झालेली मिरवणूक कुमार गंधर्व रंग मंदिरापर्यंत अतिशय शिस्तबद्ध आणि आकर्षकरित्या निघाली. मिरवणुकीच्या अग्रभागी रंगीबेरंगी फुग्यांची कमान हे मिरवणुकीचे आकर्षण बनले होते तर विविध आकर्षक पोशाखातील तृतीयपंथीय ढोल-ताशांच्या तालावर नृत्य करीत होते. शहरातील रहदारीला कोणताही अडथळा न होता जल्लोषात व शिस्तबद्धरित्या निघालेली तृतीयपंथीयांची ही मिरवणूक शहरवासीयांचे लक्ष वेधून घेत होती. या मिरवणुकीची सांगता झाल्यानंतर कुमार गंधर्व रंगमंदिर येथे तृतीयपंथीयांच्या सांस्कृतिक कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. 26 नोव्हेंबर संविधान दिन हा तृतीय पंथीय लोकांसाठी त्यांच्या हक्काचा दिवस आहे संविधान दिन हा तृतीयपंथीय लोग स्वातंत्र्याचा दिवस म्हणून साजरा करतात मिरवणूक व सांस्कृतिक कार्यक्रमानंतर कुमार गंधर्व रंगमंदिर येथे दुपारच्या जेवणाचे आयोजन करण्यात आले होते. त्यानंतर सरकारी नामनिर्देशित अधिकाऱ्यांना निमंत्रित करून त्यांच्यासमोर तृतीयपंथी यांच्या समस्या, मागण्या व त्यांचे हक्क याबाबत चर्चासत्राचे आयोजन करण्यात आले होते.
Belgaum Varta Belgaum Varta