

बेळगाव : संगीताच्या स्पर्शाने अध्यापन अधिक प्रभावी होते आणि प्रभावितपणे झालेले अध्यापन दीर्घ काळ विद्यार्थ्यांच्या मनावर ठसा उमटवते यावर दृढ विश्वास असणाऱ्या मराठा मंडळाच्या अध्यक्षा डॉ. राजश्रीताई नागराजू यादव यांच्या विशेष प्रयत्नातून गुरूवार दिनांक 27 नोव्हेंबर रोजी बेळगाव येथील कुमार गंधर्व सभागृहात जीवन संगीत या शिक्षणाला वाहिलेल्या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.
सदर कार्यक्रमात मराठा मंडळ शिक्षण संस्थेत कार्यरत असणाऱ्या सर्व शिक्षक,मुख्याध्यापक, प्राध्यापक व प्राचार्याचा सहभाग होता.
संगीताच्या तालावर, पेटी, पक्वाज आणि गिटारवर लोकप्रिय गाण्याचे सुर छेडत शिक्षण कसे अविस्मरणीय करावे? याचे मार्गदर्शन संगीत संयोजक डॉ. संतोष बोराडे यांनी केले.
सुरवातीला मराठा मंडळाच्या अध्यक्षा डॉ. राजश्रीताई नागराजू यादव यांनी संगीत म्हणजे भावनिक बंध आहे, हा भावनिक बंध जर शिक्षण प्रक्रियेला जोडला तर शिक्षण प्रक्रिया अधिक मजबूत होते, व ती मजबूत व्हावे व या प्रक्रियेतून शिक्षक आणि विद्यार्थ्यांनी शिकण्याचा मनसोक्त आनंद लुटावा यासाठीचा हा आपला छोटासा प्रयत्न असल्याचे त्यांनी आपल्या प्रास्ताविकात नमूद केले.
प्रारंभी मराठा मंडळाचे उपाध्यक्ष श्री. दिनकरराव ओऊळकर यांनी डाॅक्टर संतोष बोराडे (मुंबई) यांचा शाल व पुष्पगुच्छ अर्पण करून सन्मान केला, पकवाज वादक श्री. नरेंद्र भोईर (मुंबई) यांचा सन्मान मराठा मंडळ ट्रस्ट बोर्ड सदस्य श्री. रामचंद्रराव मोदगेकर यांनी केला तर, संचालक श्री. विनायक घसारी यांनी गिटारवादक श्री. प्रितीश चौधरी (मुंबई) यांचा गौरव केला.
डॉ. श्रीमती कोटरशेट्टी यांनी नृत्यांगना कुमारी कला गौरवी (आमरावती) यांचा सन्मान केला.
संगीताच्या स्पर्शातून शैक्षणिक परिवर्तन घडू शकते, शिक्षकांनी आपल्या आजूबाजूला निर्माण केलेल्या संकुचितपणाच्या आणि न्यूनगंडाच्या भिंती तोडायला हव्यात, वर्गात जाणाऱ्या प्रत्येक शिक्षकांने वात्सल्याचा, आपुलकीचा आणि प्रेमाचा भाव चेहऱ्यावर ठेवायला हवा, जेणेकरून भिती नावाचा बागुलबुवा कुठेच अडसर बनून शिक्षणात व्यत्यय आणणार नाही, जेणेकरून शिकणं आणि शिकवणं अगदी “आनंदाची डोही आनंद तरंग!” होऊन जाईल .
संगीत हे केवळ मनोरंजनाचे माध्यम नसून ते आत्मिक समाधान निर्माण करण्याचे साधन आहे.
असे प्रतिपादन करणाऱ्या जीवन संगीत संयोजक डॉ संतोष बोराडेंनी स्वतः हार्मोनियम वादन करीत, विविध लोकप्रिय गाण्यांचा आधार घेत उपस्थित पाचशे शिक्षकांना स्वरात आणि मधुर सुरात चिंब भिजवून टाकले.
राग, ताल, लय आणि गाण्यांचा आधार घेत शिवाय कुमारी कला भैरवी हिच्या लक्षवेधी नृत्यातून डॉ. संतोष बोराडे यांनी जवळजवळ दोन तास अप्रतिम निवेदन आणि गायनात उपस्थित शिक्षकांना बेधुंद करून सोडलं होतं. गाणी, टाळ्या आणि हास्य यामध्ये सारेच शिक्षक रममान झाल्याचे स्पष्ट चित्र सभागृहात दिसत होते.
या प्रसंगी मराठा मंडळाचे ज्येष्ठ संचालक श्री. नागेशराव झंगरूचे, श्री. लक्ष्मणराव सैनूचे, सेक्रेटरी श्री. भाऊराव पाटील, कार्यालयीन व्यवस्थापक श्री लक्ष्मणराव मण्णूरकर, श्री. प्रमोद जाधव, श्री. लक्ष्मण कोवाडकर, श्री. दिपक तरळे व हितचिंतक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
Belgaum Varta Belgaum Varta