


आमची आई 1 डिसेंबर 2025 ला आमच्यातून निघून गेली. आज तिचा बारावा दिवस या निमित्ताने तिच्याविषयी थोडं लिहावंसं वाटलं. सगळ्यांची आक्का असली तरी, ती आमची आईच होती. नात्याने सासू असली तरी तिने आम्हा सर्वांना आईचेच प्रेम दिले. अगदी साधी, भोळी, प्रेमळ सतत आपल्या कुटुंबाची काळजी घेणारी आई… आईचं माहेर मच्छे होतं. तिचे माहेरचे नांव मलप्रभा भोमाणी सनदी. लहानपणीच आईचं लग्न झालं. येळ्ळूरचे परशुरामभाऊ नंदिहळी यांच्याशी तिचा विवाह झाला. तसं पाहिलं तर दोघांच्यात कोणत्याच बाबतीत साम्य नव्हते. आई अशिक्षित होती. तर वडील माझे सासरे B.A B.T. लग्नानंतरही ते शिकत होते. व दोघांतही व्यक्तीमत्व त्यांच्या नावांना साजेसेच होते. आई नावाप्रमाणे शांत आणि सहनशील (सोशिक) प्रेमळ होत्या. तर सासरे एकदम कडक व शिस्तीप्रिय होते. सोपे नव्हतं तिला संसाराचा धनुष्य पेलणे. तरी तिच्या शांत व सहनशील (सोशिक) स्वभावामुळे त्यांच्या संसाराची गाडी इथपर्यंत पोहोचली. माझे
सासरे समाजकार्यात सक्रीय होते. आपल्यापरिने त्यांना जितकी मदत करता येईल तेवढी तिने केली. सुरुवातीला येळ्ळूरमध्ये वसतीगृह सुरु केलं. तेव्हा वसतीगृहात सर्व जातीधर्माची मुले असल्यामुळे गावामधील महिला वर्गाचा विरोध असूनही वसतीगृहात आलेल्या मुलांची तिन्ही वेळेच्या जेवणाची व्यवस्था आई घरातच करायची. शिवाय तात्यांच्या (सासऱ्यांच्या) बरोबर लोकांचे येणे जाणे असायचे, त्यांच्या जेवणाची व्यवस्थाही आईच करायची. कधीही कसलीही तक्रार नाही. त्यामुळे तिचा समाजकार्यात व विश्व भारत सेवा समिती संस्थेच्या उभारणीत मोलाचा वाटा आहे.
घरात 7 ते 8 म्हैस, बैलजोडी, 7 ते 8 एकर शेती, स्वत:चं करून घरसंसार, पाच मुलांचा सांभाळ ती करायची. पुढे हिंदमाता विद्यालयाच्या शिक्षिका बापशेट यांच्याकडून लिहायला, वाचायला, शिवणकाम शिकून घेतलं. कधीही कोणतेही मोठेपण नाही, तक्रार नाही. एकदम साधी भोळी आई….
तिच्या नातवंडांना तिने केलेली उंडा भाकरी, भाजीभाकरी खूप आवडायची. आपल्या नातवंडांवरही जीवापाड प्रेम करणारी आई आज आमच्यातून निघून गेली. आईला आमच्याकडून साश्रूनयनांनी श्रद्धांजली!!
– सौ. सरोज प्रकाश नंदिहळी
Belgaum Varta Belgaum Varta