
बेळगाव : समाजाचे आपणही काहीतरी देणे लागतो ही संकल्पना मनात बाळगत बेळगाव येथील नेत्र तज्ञ डॉक्टर हर्षवर्धन पाटील आणि डॉक्टर प्रसाद जिरगे यांनी बेळगाव जिल्हा अंधसेवा संस्था संचलित माहेश्वरी अंधशाळेच्या विद्यार्थ्यांचे स्वतःच्या दवाखान्यात मशीनच्या सहाय्याने डोळे तपासले. माहेश्वरी अंधशाळेतील 117 अंध विद्यार्थ्यांचे दररोज वीस याप्रमाणे डोळे तपासून चाळीस विद्यार्थ्यांना चष्मा देखील दिला. ज्यांची थोडी दृष्टी आहे त्यांना अधिक चांगले दिसावे असा प्रयत्न या दोन्ही नेत्रतज्ञांनी केला आहे. या प्रित्यर्थ 12 डिसेंबर रोजी बेळगाव जिल्हा अंधसेवा संस्था व माहेश्वरी अंधशाळेच्या वतीने नेत्र तज्ञ डॉक्टर हर्षवर्धन पाटील आणि डॉक्टर प्रसाद जिरगे यांचा सत्कार करण्यात आला. संस्थेचे प्रथम उपाध्यक्ष श्री. राजेंद्र मुंदडा यांनी डॉक्टरांचा परिचय करून दिला आणि स्वागत केले. यावेळी डॉक्टर हर्षवर्धन पाटील यांनी मुलांना चष्मा वापरण्याबाबत मार्गदर्शन केले. मुलांनी नियमित चष्मा वापरल्यास पुसट दिसणारी वस्तू आणखीन स्पष्ट दिसेल जे मुलांसाठी चांगले आहे असे त्यांनी समजावून सांगितले.
त्यावेळी संस्थेचे अध्यक्ष श्री. चिंतामणी ग्रामोपाध्ये यांनी दोन्ही नेत्र तज्ञांची सेवा आमच्या संस्थेच्या मुलांसाठी अमूल्य आहे असे म्हणत दोन्ही नेत्र तज्ञांचे कौतुक केले. संस्थेचे तृतीय उपाध्यक्ष श्री. अशोक चिंडक यांनी डॉक्टरांचे दवाखान्यातील कर्मचाऱ्यांचे आभार मानले. वंदे मातरम गीताने कार्यक्रमाची सांगता झाली. या कार्यक्रमाला संस्थेचे सहकार्यदर्शी श्री. कांतेश आचार्य, श्री. आनंद जोशी, श्री. एम. बी. पाटील, संस्थेचे इतर पदाधिकारी सदस्य शाळेच्या मुख्याध्यापिका श्रीमती अनिता गावडे, सहशिक्षक शिक्षकेतर कर्मचारी विद्यार्थी वर्ग उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन श्रीमती तेजस्विनी बागेवाडी यांनी केले.
Belgaum Varta Belgaum Varta