
बेळगाव : जांबोटी ते बेळगाव मुख्य रस्त्यावर नावगे क्रॉस येथे झालेल्या भीषण अपघातात दुचाकीस्वाराचा मृत्यू झाल्याची घटना मंगळवारी सकाळी घडली. बैलूर (ता. खानापूर) येथील रहिवासी नामदेव गुंडू नाकाडी (वय ६७) असे मृताचे नाव आहे. मंगळवारी सकाळी सुमारे १०.३० वाजता ते आपल्या दुचाकीवरून (केए २२, एचएच १०३८) बैलूर येथून बामनवाडी गावाकडे जात असताना बेळगाव तालुक्यातील नावगे गावाच्या हद्दीतील स्नेहम कारखान्यासमोर हा अपघात झाला. समोरून येणाऱ्या केंद्रीय राखीव पोलिस दलाच्या ट्रकने (टीएन ३७, सीजे ५८२७) अतिवेगाने व निष्काळजीपणे वाहन चालवत दुचाकीला जोराची धडक दिल्याचे तक्रारीत नमूद करण्यात आले आहे. या धडकेत नामदेव नाकाडी गंभीर जखमी झाले. त्यांना तातडीने बेळगाव येथील खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले. उपचारादरम्यान दुपारी तीनच्या सुमारास त्यांचा मृत्यू झाला. ट्रकमधील कर्मचाऱ्यांनाही किरकोळ दुखापत झाल्याचे पोलिसांनी सांगितले. याप्रकरणी ग्रामीण बेळगाव पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून, पोलिसांनी घटनास्थळी पाहणी केली. ट्रक चालकाविरुद्ध गुन्हा नोंदवून तपास सुरू आहे.
Belgaum Varta Belgaum Varta