
बेळगाव : कृषी खात्याचे बेळगाव जिल्हा दक्षता दलाचे सहसंचालक राजशेखर इराप्पा बिजापूर यांच्या धारवाड येथील निवासस्थानासह एकूण 6 ठिकाणी मंगळवारी सकाळी लोकायुक्त पोलिसांनी एकाच वेळी छापे टाकून सर्च ऑपरेशन राबविले. त्यावेळी त्यांच्याकडे एकूण 4 कोटी 81 लाख 44 हजार 530 रुपयांची स्थावर व जंगम मालमत्ता असल्याचे आढळून आली.
राजशेखर बिजापूर हे गेल्या काही दिवसांपासून बेळगाव जिल्हा कृषी खात्यात दक्षता दलाचे सहसंचालक म्हणून सेवा बजावत आहेत. मात्र, त्यांनी त्यांच्या उत्पन्नाच्या स्रोतापेक्षा अधिक माया जमवली आहे, अशी माहिती लोकायुक्त पोलिसांना मिळाली होती. त्यानुसार धारवाडचे लोकायुक्त पोलीस अधीक्षक एस. टी. सिद्धलिंगप्पा यांच्या मार्गदर्शनाखाली सहा पथकांची स्थापना करण्यात आली.
सदर पथकांनी त्यांचे धारवाड येथील निवासस्थान, तेथीलच खासगी कार्यालय, वॉटर पार्क शिगाव यासह बेळगाव येथील कृषी कार्यालय आणि फार्म हाऊसवर मंगळवारी सकाळी एकाच वेळी छापे टाकले. सकाळपासून रात्री उशिरापर्यंत स्थावर व जंगम मालमत्तांची मोजदाद सुरु होती. त्यावेळी त्यांच्याकडे एकूण 4 कोटी 81 लाख 44 हजार 530 रुपयांची मालमत्ता असल्याचे स्पष्ट झाले.
मंगळवारी सकाळी लोकायुक्त पोलीस पथक राजशेखर बिजापूर यांच्या धारवाड येथील निवासस्थानावर छापा टाकण्यासाठी गेले होते. अधिकाऱ्यांनी त्यांच्या घरची बेल वाजवल्यानंतर बिजापूर यांनी घरच्या बाहेर लावलेल्या सीसीटीव्ही कॅमेऱ्याच्या माध्यमातून बाहेर कोण आले आहे, याची पाहणी केली. त्यावेळी त्यांना लोकायुक्त पोलीस आल्याचे समजले.
अधिकाऱ्यांच्या हाती जादा पैसे लागू नयेत म्हणून त्यांनी 50000 रुपयांचा बंडल असलेल्या पाचशेच्या नोटा फाडल्या आणि कमोडमध्ये टाकून फ्लॅश टँकचे बटन दाबण्यास सुरुवात केली. जवळपास 15 ते 20 मिनिटे त्यांनी घरचा दरवाजा उघडला नाही. कमोडमधून पैसे बाहेर ढकलण्यासाठी त्यांनी प्रयत्न केले. अधिकारी घरात दाखल झाल्यानंतर त्यांना दोन तुकडे झालेल्या 500 च्या नोटा आढळून आल्या. 50000 रुपये किमतीच्या नोटा फाडण्यात आल्या असल्या तरी घरातून 80000 रुपयांची रोकड जप्त केली आहे.
Belgaum Varta Belgaum Varta