
बेळगाव : अथणी तालुक्यातील सत्ती गावाच्या शिवारात आज दुपारी ऊस तोडणीच्या आधुनिक मशीनमध्ये अडकून दोन महिला मजुरांचा जागीच मृत्यू झाल्याची हृदयद्रावक घटना घडली.
सत्ती गावच्या हद्दीतील काडगौडा पाटील यांच्या शेतात दुपारी दोनच्या सुमारास ऊस तोडणीचे काम सुरू असताना हा अपघात झाला. बौराव्वा लक्ष्मण कोबडी (वय ६०) आणि लक्ष्मीबाई मल्लप्पा रुद्रगौडर (वय ६५) अशी मृत महिलांची नावे असून त्या सत्ती गावातील रहिवासी होत्या.

याबद्दल अधिक माहिती अशी की, शेतात आधुनिक मशीनद्वारे ऊस कापणी सुरू होती. कापलेला ऊस मशीनच्या मागील भागात गोळा करण्याचे काम या महिला करत होत्या. यावेळी यंत्राचा अंदाज न आल्याने किंवा तांत्रिक कारणाने या दोन्ही महिला मशीनच्या मागील भागात गंभीररीत्या अडकल्या आणि त्यांचा जागीच मृत्यू झाला. या घटनेनंतर मृतांच्या कुटुंबीयांनी एकच आक्रोश केला, ज्यामुळे संपूर्ण परिसरात शोककळा पसरली आहे. घटनेची माहिती मिळताच अथणी पोलीस ठाण्याच्या अधिकाऱ्यांनी तातडीने घटनास्थळी भेट देऊन पंचनामा केला. या दुर्घटनेची नोंद अथणी पोलीस ठाण्यात करण्यात आली आहे.
Belgaum Varta Belgaum Varta