

बेळगाव : येथील बेळगाव एज्युकेशन सोसायटीच्या बी.के. मॉडेल हायस्कूलच्या देदिप्यमान शताब्दी महोत्सवाचा मुख्य सोहळा आज, शनिवार दि. २० डिसेंबर रोजी अत्यंत उत्साहात संपन्न होत आहे. या ऐतिहासिक सोहळ्यासाठी देशाचे युवा नेतृत्व आणि बंगळूर दक्षिणचे खासदार श्री. तेजस्वी सूर्या प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित राहणार आहेत.
खासदार तेजस्वी सूर्या हे केवळ भारतीय जनता युवा मोर्चाचे राष्ट्रीय अध्यक्षच नव्हे, तर संसदेतील एक प्रगल्भ आणि अभ्यासू वक्ता म्हणून ओळखले जातात. अत्यंत तरुण वयात संसदेत पाऊल ठेवून त्यांनी तंत्रज्ञान, स्टार्टअप्स आणि राष्ट्रीय सुरक्षेच्या मुद्द्यांवर आपल्या परखड भाषणांनी देशाचे लक्ष वेधून घेतले आहे. डिजिटल क्रांती आणि युवा उद्योजकतेसाठी त्यांनी केलेले कार्य विशेष उल्लेखनीय आहे. त्यांच्या उपस्थितीमुळे या शताब्दी महोत्सवाचा उत्साह द्विगुणित होणार आहे.
मराठी कलाविश्वाचा चेहरा
दीपक करंजीकर या कार्यक्रमाला मराठी चित्रपट आणि नाट्यसृष्टीतील ज्येष्ठ व विस्तृत अभ्यासासाठी प्रसिद्ध असलेले अभिनेते दीपक करंजीकर यांची देखील विशेष उपस्थिती लाभणार आहे. अनेक गाजलेल्या मराठी मालिका आणि चित्रपटांतील त्यांच्या कसदार अभिनयाने त्यांनी प्रेक्षकांच्या मनावर अधिराज्य गाजवले आहे. केवळ एक कलाकारच नव्हे, तर अर्थशास्त्र आणि सामाजिक विषयांचे गाढे अभ्यासक म्हणूनही त्यांची ख्याती आहे.
मान्यवरांची मांदियाळी या सोहळ्याला राज्यसभा सदस्य ईरान्ना कडाडी, बेळगाव दक्षिणचे आमदार अभय पाटील, के.एल.ई. संस्थेचे कार्याध्यक्ष डॉ. प्रभाकर कोरे, माजी आमदार महांतेश कवटगीमठ, माजी आमदार संजय पाटील, माजी आमदार अनिल बेनके, ख्यातनाम उद्योजिका आणि शाळेच्या माजी विद्यार्थिनी श्रीमती विद्या मुरकुंबी यांसह अनेक मान्यवर उपस्थित राहणार आहेत.
उद्या भव्य प्रभात फेरी
शताब्दी महोत्सवाच्या निमित्ताने शनिवारी सकाळी ७:३० वा. बेळगाव एज्युकेशन सोसायटीच्या सर्व शाळांमधील विद्यार्थी आणि कर्मचाऱ्यांची भव्य ‘प्रभात फेरी’ काढण्यात येणार आहे.
सायंकाळी ५:३० वाजता शाळेच्या आवारात उभारलेल्या भव्य मंडपात मुख्य कार्यक्रमाला सुरुवात होईल.
या ऐतिहासिक क्षणाचे साक्षीदार होण्यासाठी शाळेचे आजी-माजी विद्यार्थी, पालक आणि बेळगावच्या नागरिकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे, असे आवाहन संस्थेचे अध्यक्ष श्री. अविनाश पोतदार व सहकाऱ्यांनी केले आहे.
Belgaum Varta Belgaum Varta