

अभ्यासाबरोबर खेळही महत्त्वाचा…
बेळगाव : शुक्रवार दिनांक 19 डिसेंबर व शनिवार दिनांक 20 डिसेंबर 2025 या दोन दिवसात मराठी विद्यानिकेतन शाळेचा वार्षिक क्रीडा महोत्सव असून क्रीडा महोत्सव उद्घाटनप्रसंगी प्रमुख पाहुणे म्हणून स्ट्रेन्थ स्टुडिओचे मालक संभाजी रमेश पावले व माया संभाजी पावले उपस्थित होते. सर्वप्रथम पाहुण्यांचे क्रीडांगणामध्ये आगमन झाले. यानंतर दोन्ही पाहुण्यांचा परिचय क्रीडा शिक्षिका वैभवी दळवी यांनी करून दिला. त्यानंतर पाहुण्यांचे स्वागत शिक्षण संयोजिका नीला आपटे, शिक्षक समन्वयक सविता पवार, माध्यमिक विभागाचे मुख्याध्यापक नारायण उडकेकर व प्राथमिक विभागाचे मुख्याध्यापक बी.जी. पाटील यांच्या हस्ते पुष्पगुच्छ व मानचिन्ह देऊन सन्मान करण्यात आला. पाहुण्यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले. ध्वजारोहणानंतर क्रीडा स्पर्धेच्या बोधचिन्हांचे उद्घाटन करून वार्षिक क्रीडामहोत्सव स्पर्धेचे उद्घाटन पाहुण्यांच्या हस्ते करण्यात आले. शाळेचे क्रांती, ज्योती, प्रगती आणि भारती गटाने स्वातंत्र्य, समता, बंधूता, न्याय या मूल्यांची ओळख करून देऊन पाहुण्यांना मानवंदना दिली. क्रीडा ज्योतीचे आगमन तन्मयी पावले, समीक्षा हिरोजी, कैवल्य घोरपडे व रघुवीर देसाई या राष्ट्रस्तरीय बक्षीसप्राप्त खेळाडू तसेच राज्यस्तरीय खेळाडूंच्या हस्ते क्रीडांगणात करण्यात आले. श्रेया भातकांडे हिने प्रतिज्ञा दिली. त्यानंतर प्रमुख पाहुणे स्ट्रेंथ स्टुडिओचे मालक संभाजी पावले यांनी मुलांना खेळाविषयी उत्तम मार्गदर्शन व खेळाचे महत्व आपल्या अनुभवातून सांगून मनोगत व्यक्त केले . शाळेच्या खेळाडूंना मदत करण्याचेही त्यांनी सांगितले. तसेच खेळ म्हणजे केवळ पदक किंवा बक्षीस जिंकणे नाही तर खेळ म्हणजे शिस्त, चिकाटी, संघभावना आणि स्वतःवर विजय मिळवणे होय. खेळ खेळताना काहीजण जिंकतील तर काहीजण हरतील, जिंकणारा विद्यार्थी हा चांगलाच असतो पण हार न मानता प्रयत्नशील राहतो तो महान खेळाडू असतो असे मनोगत संभाजी पावले यांच्या सहपत्नी माया पावले यांनी व्यक्त केले. क्रीडा महोत्सव यशस्वी करण्यासाठी क्रीडा शिक्षक महेश हगीदळे, दत्ता पाटील, श्रीधर बेन्नाळकर व वैभवी दळवी यांनी विशेष परिश्रम घेतले.
उद्घाटन कार्यक्रमाचे सूत्रसंचालन शिक्षिका शाहीन वाय. मन्नूर यांनी केले. आभार प्रदर्शन क्रीडा शिक्षक दत्ता पाटील यांनी मानले. शिक्षण संयोजिका नीला आपटे, माध्यमिक विभागाचे मुख्याध्यापक नारायण उडकेकर व प्राथमिक विभागाचे मुख्याध्यापक बी.जी. पाटील, शिक्षक समन्वयक सविता पवार, शाळेचे शिक्षक, विद्यार्थी उपस्थित होते.

Belgaum Varta Belgaum Varta