
राजमाता जिजाऊ सांस्कृतिक प्रतिष्ठान आयोजित वधु-वर मेळाव्याला उदंड प्रतिसाद
बेळगाव : मुला-मुलींची वेळेत लग्न लावणे एक महत्त्वाची सामाजिक समस्या होऊन बसली आहे. राज्यभरातील मराठा समाजातील परिस्थितीची आम्हाला चांगली जाणीव आहे. मुला मुलींची वेळेत लग्न एक चिंतेचा विषय बनला आहे. अशावेळी वधू वर मेळावे आणि सामुदायिक विवाह सोहळे एक पवित्र आणि पुण्याचे कार्य ठरत आहे. अशा सामाजिक उपक्रमातून समाजही एकत्रित होत आहे. अशा उपक्रम आणि कार्यक्रमांच्या माध्यमातून समाजामध्ये जागरूकता, चिंतनमंथन होत राहणे आवश्यक आहे. यासाठी डॉ. सोनाली सरनोबत यांनी राजमाता जिजाऊ सांस्कृतिक प्रतिष्ठानच्या वतीने चालविलेले कार्य कौतुकास्पद असल्याचे प्रतिपादन कर्नाटक राज्य मराठा विकास महामंडळाचे माजी अध्यक्ष आणि विधान परिषद सदस्य मारुतीराव मुळे यांनी बोलताना केले.


आज रविवारी धारवाड रोड येथील रूपाली कन्व्हेन्शन हॉल येथे राजमाता जिजाऊ सांस्कृतिक प्रतिष्ठान यांच्यावतीने मराठा समाज वधू वर मेळाव्याच्या आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमाला आम. मारुतीराव मुळे प्रमुख अतिथी म्हणून उपस्थित होते. कार्यक्रमाच्या प्रारंभी आम. मुळे यांच्या हस्ते राजमाता जिजाऊ यांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले. वधू वर मेळाव्याच्या मुख्य आयोजक डॉक्टर सोनाली सरनोबत यांनी आम. मारुतीराव मुळे यांचा सत्कार केला.
प्रास्ताविक पर भाषणात डॉ. सोनाली सरनोबत म्हणाल्या की, लग्न जुळविताना मुला-मुलींच्या वाढलेल्या अपेक्षा आणि त्यातून पालक आणि मुलांमध्ये होत असलेली घुसमट चिंतेचा विषय बनला आहे. या विषयाचे गांभीर्य ओळखूनच राजमाता जिजाऊ सांस्कृतिक प्रतिष्ठानच्या वतीने वधूवर मेळावा आयोजित केले जात आहेत. नियती फौंडेशनच्या माध्यमातून यापूर्वी महिला आणि विद्यार्थ्यांसाठी अनेक उपक्रम राबविले गेले आहेत. अशा सामाजिक उपक्रमांबरोबरच भावी काळात सामुदायिक विवाह सोहळा आयोजित करण्यात येणार आहे. नियती फौंडेशन आणि राजमाता जिजाऊ सांस्कृतिक प्रतिष्ठानच्या कार्याला, कर्नाटक राज्य क्षत्रिय मराठा परिषदेचे पाठबळ मिळत असल्याचेही त्यांनी यावेळी स्पष्ट केले.
आजच्या वधु- वर मेळाव्याला मराठा समाजातील तब्बल 400 हून अधिक इच्छुक वधू-वरांनी नोंदणी केली होती. पालकांनीही या मेळाव्या प्रसंगी मोठ्या संख्येने उपस्थिती दर्शवली.
Belgaum Varta Belgaum Varta