
बेळगाव : भाजप प्रदेशाध्यक्ष बी. वाय विजयेंद्र यांनी राज्यात ड्रग्स माफिया आणि बेकायदेशीर स्थलांतराच्या मुद्द्यावरून राज्य सरकारवर जोरदार टीका केली. बेळगाव येथील पर्यटन केंद्रात आयोजित पत्रकार परिषदेत बोलताना विजयेंद्र यांनी राज्यातील अमली पदार्थांच्या वाढत्या प्रकरणामुळे कर्नाटक राज्य “उडता पंजाब” होत असल्याची गंभीर टीका केली आणि कर्नाटक राज्य काँग्रेस अमली पदार्थांवर आळा घालण्यास पूर्णपणे अपयशी ठरल्याचा आरोप केला.
नुकताच मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांच्या होमटाऊन समजल्या जाणाऱ्या म्हैसूर जिल्ह्यात महाराष्ट्र पोलिसांकडून माफियांचा पर्दाफाश झाला परंतु कर्नाटक सरकार मात्र अमली पदार्थांवर आळा घालण्यास पूर्णपणे अपयशी ठरले असून राज्य गृहमंत्र्यालयाने कोणतीच कारवाई न केल्याबद्दल नाराजी व्यक्त केली. त्याचप्रमाणे येलहंका मतदार संघातील भागात केरळ मधून बेकायदेशीर स्थलांतरितांचा मुद्दा उपस्थित करत कर्नाटक सरकार त्यांना मोफत घरे देत असल्याचा आरोप देखील त्यांनी यावेळी केला. 1 जानेवारी रोजी कन्नडिग आणि गरीब जनतेसाठी घरे देण्याची घोषणा करत असताना बेकायदेशीर स्थलांतरितांना कोणत्या आधारावर घरे देणार असा सवाल उपस्थित केला त्याचप्रमाणे गृहलक्ष्मी योजनेवर देखील त्यांनी ताशेरे ओढले. गृहलक्ष्मी योजनेअंतर्गत राज्यातील महिलांच्या खात्यावर पैसे जमा न झाल्याचा आरोप त्यांनी केला त्याचप्रमाणे योजनेअंतर्गत जाहीर केलेले 5000 कोटी अद्याप लाभार्थ्यांच्या खात्यात जमा झाले नाहीत याबाबत मुख्यमंत्री आणि संबंधित मंत्र्यांकडून मौन बाळगण्यात आल्याचे देखील त्यांनी सांगितले. हमी योजना यशस्वी करण्यासाठी सरकारच्या तिजोरी कडकडाट आहे त्यामुळे हमी योजना पूर्णत्वास नेण्यास कर्नाटक सरकार अपयशी झाल्याचे देखील त्यांनी यावेळी सांगितले.
या पत्रकार परिषदेत बेळगाव ग्रामीण जिल्हा अध्यक्ष सुभाष पाटील, शहराध्यक्ष गीता सुतार, माजी आमदार संजय पाटील, भाजप प्रदेश उपाध्यक्ष अनिल बेनके यांच्यासह पक्षाचे पदाधिकारी आणि कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.
Belgaum Varta Belgaum Varta