बेळगाव : बेळगाव मध्यवर्ती बसस्थानकावर प्रवासादरम्यान एका महिलेचे सोन्याचे दागिने आणि रोख रक्कम चोरणाऱ्या एका शिक्षिकेला मार्केट पोलिसांनी रंगेहात पकडले आहे.
अटक करण्यात आलेली महिला बेळगाव तालुक्यातील हिंडलगा लक्ष्मी नगर येथील रहिवासी असून तिचे नाव पद्मश्री मजगावी असल्याचे समोर आले आहे. ही महिला शहरातील एका नामांकित खासगी शैक्षणिक संस्थेत शिक्षिका म्हणून कार्यरत असल्याने या घटनेमुळे शिक्षण क्षेत्रात मोठी खळबळ उडाली आहे.
हैदराबादहून पारेवाडला जाण्यासाठी बसमध्ये चढत असताना अक्षता नावाच्या महिलेच्या बॅगेतून सोन्याचे दागिने आणि पैसे चोरण्यात आले. बसस्थानकावरील गर्दीचा फायदा घेत ही शिक्षिका चोऱ्या करत असल्याचे पोलिसांच्या निदर्शनास आले. पकडले जाण्याच्या भीतीने तिने सोन्याचे मंगळसूत्र खिडकीतून खाली फेकून दिले होते, जे पोलिसांनी हस्तगत केले आहे. मात्र, फिर्यादीचे पाकीट आणि रोख रक्कम अद्याप मिळणे बाकी आहे.
मार्केट पोलिसांनी आरोपी शिक्षिकेला ताब्यात घेऊन कसून चौकशी सुरू केली आहे. प्राथमिक चौकशीत तिने आपल्या गुन्ह्याची कबुली दिली असल्याचे समजते. या चौरीमागे एखादी टोळी कार्यरत आहे का, किंवा यापूर्वीही तिने अशा प्रकारे चोऱ्या केल्या आहेत का, याचा तपास पोलीस करत आहेत. याप्रकरणी बेळगाव मार्केट पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून अधिक तपास सुरू आहे असे त्यांनी सांगितले.
Belgaum Varta Belgaum Varta