बेळगाव : शेतकऱ्यांच्या जिवाशी खेळून सुरू असलेले हलगा-मच्छे बायपासचे काम तात्काळ थांबवावे, या मागणीसाठी आज पुन्हा एकदा शेतकऱ्यांनी आक्रमक पवित्रा घेतला. बेळगावमध्ये या बायपासच्या कामावरून शेतकरी आणि कंत्राटदार यांच्यात जोरदार वादावादी झाली असून परिसरात तणावाचे वातावरण निर्माण झाले आहे.
बेळगावमध्ये हलगा-मच्छे बायपासच्या कामाला शेतकऱ्यांनी पुन्हा एकदा कडाडून विरोध दर्शवला आहे. आज कंत्राटदारांनी काम सुरू करण्याचा प्रयत्न केला असता शेतकरी आणि कंत्राटदारांमध्ये शाब्दिक चकमकी उडाल्या. घटनेची माहिती मिळताच शेतकरी नेते आणि पोलीस अधिकारी घटनास्थळी दाखल झाले असून दोन्ही बाजूंमध्ये मोठी वादावादी झाली.
यावेळी शेतकरी नेते राजू मरवे यांनी प्रशासनावर गंभीर आरोप केले आहेत. न्यायालयाने स्थगिती दिली असतानाही हलगा-मच्छे बायपासचे काम अनधिकृतपणे रेटले जात असल्याचे त्यांनी सांगितले. २००९ पासून शेतकरी या प्रकल्पाला विरोध करत आहेत, मात्र शेतकऱ्यांच्या भावना पायदळी तुडवून हे काम केले जात आहे. या प्रकल्पामुळे १०४७ शेतकऱ्यांची १६० एकर सुपीक जमीन नष्ट होणार असून, जोपर्यंत शरीरात शेवटचा श्वास आहे तोपर्यंत हे काम होऊ देणार नाही, असा इशारा त्यांनी दिला.
प्रकाश नाईक यांनी यावेळी माहिती देताना सांगितले की, हलगा-मच्छे बायपास रस्त्याचे हे काम पूर्णपणे अनधिकृत आहे. उच्च न्यायालय आणि जिल्हा न्यायालयाच्या आदेशांचे जिल्हाधिकाऱ्यांनी उल्लंघन केले असून, या आदेशांची त्यांनी पुन्हा एकदा पडताळणी करण्याची गरज असल्याचे त्यांनी नमूद केले.
Belgaum Varta Belgaum Varta