
बेळगाव : वझे गल्ली वडगाव येथील रहिवासी ईरण्णा गदीगेप्पा बळगावी यांचे वृद्धापकाळाने निधन झाले. निधनसमयी ते ९२ वर्षाचे होते.
गेली अनेक वर्षे ते सपत्नीक मल्लिकार्जुन मंदिराची देखभाल करीत असत. दोन वर्षांपूर्वी त्यांच्या पत्नीच्या निधनानंतर एकटेच रहात होते.
त्यांच्या निधनाची बातमी समजताच जायंट्स आय फौंडेशनचे संस्थापक अध्यक्ष मदन बामणे यांनी त्यांच्या वडगाव येथील कुरूहीणशेट्टी समाजाच्या समाज बांधवाशी चर्चा करून त्यांना देहदानाविषयी माहिती दिली त्यांच्या होकारानंतर त्यांचा देह जवाहरलाल नेहरू वैद्यकीय महाविद्यालयाला दान करण्यात आला. तसेच के एल ई नेत्रपेढीला नेत्रदान करण्यात आले आणि के एल ई रोटरी स्किन बँकेला त्वचादान करण्यात आली.
ईरण्णा यांच्या देहदानामुळे वैद्यकीय शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांना मदत होणार आहे तर नेत्रदानामुळे दोन अंध व्यक्तींना हे जग पाहण्याची संधी मिळणार आहे तसेच त्वचादान केल्याने गरजूंना मदत होणार आहे.
जायंट्स आय फौंडेशनच्या वतीने श्री मल्लिकार्जुन मंदिर कमिटी आणि समाज बांधवाचे आभार मानण्यात आले.

Belgaum Varta Belgaum Varta