Tuesday , March 3 2026
Breaking News

‘मंथन’चे महिला साहित्य संमेलन उद्या

Spread the love

 

वरेरकर नाट्यसंघात आयोजन : विविध मान्यवरांची उपस्थिती; चार सत्रांत रंगणार

बेळगाव : मंथन कल्चरल अँड सोशल वेल्फेअर सोसायटीतर्फे ३९ वे महिला साहित्य संमेलन रविवारी (दि. ८) सकाळी १० वा. टिळकवाडीतील वरेरकर नाट्य संघात आयोजित केले आहे. संमेलनाध्यक्षपदी पुण्यातील ज्येष्ठ लेखिका अंजली कुलकर्णी आहेत.

पहिल्या सत्रात संमेलनाचे उद्घाटन व स्त्रियांच्या कवितेतील बदलते प्रवाह या विषयावर अंजली कुलकर्णी यांचे अध्यक्षीय भाषण होणार आहे. त्यानंतर विविध स्पर्धांचा बक्षीस वितरण होणार आहे. दुसऱ्या सत्रात रणजीत चौगुले “मारुती चित्तमपल्ली एक अरण्यऋषी” या विषयावर बोलणार आहेत. तिसऱ्या सत्रात ‘आजच्या बदलत्या परिस्थितीतील माणूस : सकारात्मक की नकारात्मक’ या विषयावर परिसंवाद होणार आहे. यात डॉ. अश्विनी बेळगावकर व स्वाती जोग सहभागी होणार आहेत. चौथ्या सत्रात काव्याच्या प्रांगणात हा कार्यक्रम डॉ. दिलीप कुलकर्णी सादर करणार आहेत.

अंजली कुलकर्णी या मराठी साहित्यातील स्त्रीवादी कवयित्री, लेखिका, विचारवंत आणि कार्यकर्त्या म्हणून परिचित आहेत. त्यांनी ललित लेखन, वैचारिक लेखन, संपादन, अनुवाद, सामाजिक चरित्र लेखन, बाल साहित्याच्या प्रांतात मोलाची भर घातली आहे. त्यांची आतापर्यंत २३ पुस्तके प्रकाशित झाली असून त्यात सहा कवितासंग्रह आहेत. त्यांच्या कवितेतून स्त्री अस्मिता सामाजिक वास्तव राजकीय जाणीव आणि मानवी संवेदनशीलता प्रभावीपणे व्यक्त होते. त्या महाराष्ट्र साहित्य परिषदेत सध्या कार्यवाह म्हणून कार्यरत आहेत
डॉ. अश्विनी बेळगावकर या समुपदेशन व मानसिक आरोग्य क्षेत्रात कार्यरत असलेल्या मानसशास्त्रज्ञ आहेत. त्यांनी अमेरिकेतील न्यूयॉर्क येथे शैक्षणिक व कार्पोरेट क्षेत्रात मानसशास्त्रज्ञ तर सांबरा एअर फोर्स बेस येथे सल्लागार मानसशास्त्रज्ञ म्हणून कार्य केले आहे. स्वाती जोग या डिजिटल मार्केटिंग, मीडिया, शिक्षण व वारसा संवर्धन क्षेत्रात सक्रिय आहेत. त्या ईशान्य व्हेंचर्स या डिजिटल मार्केटिंगवर मीडिया कंपनीच्या त्या संस्थापक आहेत. डॉ. दिलीप कुलकर्णी हे ज्येष्ठ वैद्यकीय, व्यावसायिक व साहित्यिक आहेत. वैद्यकीय क्षेत्रासोबतच साहित्य, संगीत व सांस्कृतिक चळवळीत त्यांचे योगदान आहे. शिवाजी विद्यापीठ व कर्नाटक माध्यमिक पाठ्यपुस्तकात त्यांच्या कवितांचा समावेश आहे. रणजीत चौगुले हे शिक्षक, स्तंभलेखक, सूत्रसंचालक असून ते सरकारी सरदार्स हायस्कूल बेळगाव येथे शिक्षक म्हणून कार्यरत आहेत. रणजित चौगुले यांनी एम.ए., बी.एड., एम.फिल. या शैक्षणिक पदव्या संपादन करून NET ही परीक्षा गुणवत्ता श्रेणीत उत्तीर्ण केली आहे. तसेच मराठी विषयात त्यांना ‘कृ. ब. निकुंब’ आणि ‘रावसाहेब गोगटे’ ही सुवर्णपदके प्राप्त झाली आहेत. सध्या ते सरकारी सरदार्स हायस्कूल, बेळगाव येथे शिक्षक म्हणून कार्यरत असून त्यांनी यापूर्वी सरकारी हायस्कूल, रामनगर (ता. जोयडा) येथे अध्यापनाची सुरुवात केली. ‘ई-लेखक भेट’ हा उपक्रम त्यांच्या शैक्षणिक नवविचारांचा उत्तम नमुना आहे. पत्रकारितेच्या क्षेत्रात त्यांनी दै. तरुण भारत, वार्ता आणि स्वतंत्र प्रगती या दैनिकांमध्ये उपसंपादक म्हणून काम केले आहे. साहित्य, शिक्षण, क्रीडा व सामाजिक विषयावर ३०० हून अधिक लेख त्यांनी लिहिले आहेत. दै. सकाळ मधील ‘इये साहित्येचिये नगरी’ (२०२१-२३) हे त्यांचे विशेष गाजलेले सदर असून त्यातून त्यांनी जुन्या लेखकांचे साहित्यविश्व वाचकांसमोर उलगडले. त्यांना आदर्श शिक्षक पुरस्कार, विशेष साहित्य पुरस्कार असे विविध सन्मान प्राप्त झाले असून २०२२ साली ते १६ व्या कुद्रेमनी साहित्य संमेलनाचे अध्यक्ष होते. अखिल भारतीय मराठी साहित्य परिषद, बेळगावचे सचिव म्हणून तसेच अनेक साहित्य संमेलनांचे आयोजक म्हणूनही त्यांचे योगदान उल्लेखनीय आहे.

About Belgaum Varta

Check Also

बेळगाव जिल्हा न्यायालयात बॉम्बच्या अफवेने खळबळ

Spread the love  बॉम्ब शोध पथकाची तपासणी ; सुरक्षा कडक बेळगाव : बेळगाव येथील जिल्हा …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *