
संजीवीनी फाउंडेशनचा कौटुंबिक स्नेहमेळावा उत्साहात संपन्न
बेळगाव : संजीवीनी काळजी केंद्र म्हणजे परिपूर्ण कुटुंब असून पाच वर्षांची प्रेरणादायी आणि कौतुकास्पद वाटचाल, जीव ओतून काम करणारे कर्मचारी आणि नावाप्रमाणे रुग्णांच्या आयुष्याला संजीवनी देणारी संस्था अशी संजीवीनीची ओळख निर्माण झाली असल्याचे प्रतिपादन प्रमुख पाहुण्या उगार साखर कारखान्याच्या स्मिता शिरगावकर यांनी आपल्या मनोगतातून व्यक्त केले. आव्हाने स्वीकारल्याने अथवा आव्हानांना सामोरे गेल्याने जीवन अधिक सक्षम बनते तेच कार्य ही मंडळी करीत असल्याचेही त्या म्हणाल्या.
संजीवीनी फाउंडेशनचा कौटुंबिक स्नेहमेळावा तसेच पाचव्या वर्धापन दिनानिमित्त आयोजित कार्यक्रम मोठ्या उत्साहात पार पडला यावेळी त्या बोलत होत्या.
दुसरे प्रमुख पाहुणे जयभारत फौंडेशनचे व्यवस्थापक बसनगौडा पाटील यांनी संस्थेच्या कार्याचे कौतुक करताना सांगितले की, “एखादी संस्था स्थापन करणे सोपे असते; मात्र ती सातत्याने चालू ठेवून समाजहिताचे कार्य करणे अत्यंत जोखमीचे असते. ही जोखीम पत्करून संजीवीनीची टीम एक आव्हानात्मक काम करीत आहे असे सांगून संजीवीनीच्या कार्याला मनःपूर्वक शुभेच्छा दिल्या.
कार्यक्रमाची सुरुवात शोभा कुलकर्णी यांच्या गणपती बाप्पांच्या गीताने झाली. मान्यवरांच्या हस्ते दीपप्रज्वलन करून कार्यक्रमाचे उद्घाटन करण्यात आले. प्रास्ताविकात संस्थापिका डॉ. सविता देगीनाळ यांनी संस्थेच्या पाच वर्षांच्या प्रवासाचा सविस्तर आढावा घेतला. पाहुण्यांचे स्वागत व परिचय संजीवनी पोतदार यांनी करून दिला.
प्रमुख पाहुण्यांना काळजी केंद्रात तयार केलेले नॅपकिन बुके, स्मृतिचिन्ह आणि फराळ देऊन सन्मानित करण्यात आले. स्मिता शिरगावकर यांचा सन्मान डॉ. सविता देगीनाळ यांनी, तर बसनगौडा पाटील यांचा सन्मान चेअरमन मदन बामणे यांच्या हस्ते करण्यात आला.
संजीवीनी फौंडेशनला पाच वर्षे पूर्ण झाल्याबद्दल उपस्थित मान्यवर काळजी केंद्रातील सदस्य कुटुंबीय आणि कर्मचारी यांच्या हस्ते केक कापण्यात आला.
यानंतर वार्षिक क्रीडा स्पर्धेतील विजेत्या स्पर्धकांना प्रमाणपत्रांचे वितरण डॉ. चंद्रशेखर ई. टी., डॉ. अनिल पोटे, डॉ. रविंद्र अनगोळ, डॉ. तृप्ती पोटे, सौरभ पोटे, आसावरी भोकरे, सन्नी कांबळे l,भाग्यश्री कांबळे, सी व्ही कुलकर्णी, डॉ.नवीना शेट्टीगार, प्रीती चौगुले, रेखा बामणे आणि विद्या सरनोबत या मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले.
कौटुंबिक स्नेहमेळाव्याचा मुख्य आकर्षण ठरले ते काळजी केंद्रातील सदस्यांचे नृत्य सादरीकरण. विविध गाण्यांवर वयोवृद्ध सदस्यांनी सादर केलेल्या नृत्यांना उपस्थितांनी भरभरून दाद दिली. मनोरुग्ण विभागातील सदस्यांनीही उत्साहपूर्ण सादरीकरण करून सर्वांची मने जिंकली.
शेवटी कर्मचाऱ्यांनी सादर केलेल्या धमाल नृत्यांनी कार्यक्रमात रंगत आणली.
अध्यक्षीय भाषणात चेअरमन मदन बामणे यांनी सर्व विजेत्यांचे अभिनंदन करत गेल्या महिनाभर स्नेहसंमेलन यशस्वी करण्यासाठी परिश्रम घेतलेल्या सर्वांचे कौतुक केले. दानशूर व्यक्तींचे आभार मानताना त्यांनी येत्या दोन वर्षांत त्यांच्या सहकार्याने स्वतःच्या वास्तूत काळजी केंद्राचा विस्तार करून दोनशे खाटांपर्यंत सेवा वाढविण्याचा संकल्प व्यक्त केला.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन तेजस्विनी सोमसाळे यांनी केले, तर आभार प्रदर्शन सागरिका यांनी मानले. कार्यक्रमास कुटुंबीय, हितचिंतक व अनेक मान्यवर मोठ्या संख्येने उपस्थित होते.
एकूणच संजीवीनीचा कौटुंबिक स्नेहमेळावा आनंद, आपुलकी आणि उत्साहाच्या वातावरणात यशस्वीरीत्या आय एम ई आर कॉलेजच्या सभागृहात कार्यक्रम पार पडला.
Belgaum Varta Belgaum Varta