
बेळगाव : एमबीबीएसमध्ये प्रवेश मिळवून देण्याचे त्याचप्रमाणे रशियामध्ये नोकरीचे आमिष दाखवून यमनापूर येथील डॉक्टर दांपत्याने बेळगाव शहरातील जवळपास 37 जणांची फसवणूक करून 75 लाख रुपयांना गंडविल्याचा प्रकार घडला आहे. याप्रकरणी संबंधित डॉक्टरवर पोलिस स्थानकात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
याबाबत सविस्तर वृत्त असे की, डॉक्टर सुरज अशोक अनगोळकर हे यमनापूर येथील हरिप्रिया कुंज, मारुती गल्ली येथील रहिवासी असून ते आपल्या पत्नी समवेत राजेंद्र कॉम्प्लेक्स खडेबाजार बेळगाव येथे स्नेहा क्लीनिक नावाने दवाखाना चालवीत असल्याची माहिती उपलब्ध झाली आहे. या संदर्भात खडेबाजार पोलीस स्थानकात गुन्हा नोंद करण्यात आला आहे. न्यू गांधीनगर येथील रहिवासी अझरूद्दीन अब्दुल समद रंगारी (वय 32) यांनी दिलेल्या तक्रारीनुसार आरोपी अनगोळकर यांनी नोव्हेंबर 2024 मध्ये फिर्यादींशी संपर्क साधला आणि आपण रशिया मधून एमबीबीएस शिक्षण पूर्ण केले असून तेथील महाविद्यालयांशी आपले कनिष्ठ संबंध असल्याचा दावा त्यांनी केला त्या ओळखीच्या आधारे वैद्यकीय शिक्षणासाठी प्रवेश मिळवून देण्याबरोबरच रशिया चांगल्या पगाराची नोकरी लावून देण्याचे आश्वासन देखील त्यांनी फिर्यादीना दिले. दरमहा एक लाख 4 हजार रुपये पगार तसेच जेवणाची सोय असल्याचे सांगत त्यांनी बेळगावातील काही जणांचा विश्वास संपादन केला. डॉक्टरांच्या बोलण्यावर विश्वास ठेवून तक्रारदाराने आणि त्यांच्या इतर सहकार्याने मिळून सुमारे 74 लाख रुपये दिले आहेत. यामध्ये सुमारे 13 लाख रुपये फोन पे द्वारे तर उर्वरित रक्कम ही रोख स्वरूपात दिल्याचे तक्रारीत नमूद करण्यात आले आहे. आरोपीने भारतातून 22 उमेदवारांना नोकरीचे आमिष दाखवून रशियाला पाठविले. परंतु परदेशात पाठवत असताना कामासाठीच्या व्हीजा देण्याऐवजी प्रवासी व्हिजा देऊन रशियाला पाठविले. मात्र पंधरा दिवसातच त्यांना परत भारतात पाठवण्यात आल्याने आपली फसवणूक झाल्याचे त्यांच्या लक्षात येताच पिडितांनी भारतात आल्यानंतर पोलीस स्थानकात धाव घेतली. या प्रकरणाचा पुढील तपास पोलीस निरीक्षक महांतेश धामणवर करीत आहेत.
Belgaum Varta Belgaum Varta