Tuesday , March 3 2026
Breaking News

दूरदृष्टीपूर्ण नियोजन आणि कडक शिस्त – पी.यू.सी. परीक्षेसाठी श्री. एम. एम. कांबळे यांची ठाम भूमिका

Spread the love

 

बेळगाव : बेळगाव येथे पार पडलेल्या पी.यू.सी. द्वितीय वर्ष परीक्षा पूर्वतयारी बैठकीत जिल्हा पदवीपूर्व शिक्षणाधिकारी श्री. एम. एम. कांबळे यांच्या नेतृत्वाची ठसठशीत छाप उमटली. येत्या 28/02/2026 पासून सुरू होणाऱ्या वार्षिक परीक्षेच्या पार्श्वभूमीवर त्यांनी सर्व तयारीचा अत्यंत बारकाईने, चाणाक्ष बुद्धीने आणि अचूक नियोजनाने आढावा घेतला. त्यांच्या प्रत्येक सूचनेत शिस्त, जबाबदारी आणि पारदर्शकतेचा स्पष्ट संदेश होता.
बैठकीच्या प्रारंभी उपस्थितांचे स्वागत ज्योती महाविद्यालयाचे प्राचार्य श्री. एस. एस. पाटील यांनी केले. व्यासपीठावर प्राचार्य शिरशाड, प्राचार्य रवीशंकर मठ, प्राचार्य वाय एम पाटील तसेच प्राचार्य बंजत्री यांची प्रमुख उपस्थिती होती. या बैठकीस बेळगाव जिल्ह्यातील सरकारी, अनुदानित व विनाअनुदानित पदवीपूर्व महाविद्यालयांचे सर्व प्राचार्य व केंद्र प्रमुख आवर्जून उपस्थित होते, यावरून बैठकीचे गांभीर्य आणि महत्त्व अधोरेखित झाले.
डी.डी.पी.यू. श्री. एम. एम. कांबळे यांनी केंद्रप्रमुख, केंद्र पर्यवेक्षक, जॉईंट चीफ, सिटिंग स्क्वॉड, उत्तरपत्रिका अधिकारी, सीसीटीव्ही कॅमेरे, वेबकास्टिंग तसेच इंटरनेट व्यवस्थेचा सखोल आढावा घेतला. कोणतीही त्रुटी सहन केली जाणार नाही, असा स्पष्ट इशारा देत त्यांनी संबंधित अधिकाऱ्यांना जबाबदारीची ठाम जाणीव करून दिली. परीक्षेच्या दिवशी सकाळी साडेसातपर्यंत सर्व अधिकारी केंद्रावर हजर राहून आवश्यक पूर्तता करावी, असे कडक निर्देश त्यांनी दिले.
मागील परीक्षेत आलेल्या अडचणींचे नेमके विश्लेषण करत त्या पुन्हा उद्भवू नयेत यासाठी ठोस उपाययोजना आखण्याच्या सूचना त्यांनी मांडल्या. समस्यांचा वेध घेऊन त्यावर परिणामकारक उपाय सुचविण्याची त्यांची कार्यपद्धती उपस्थितांना प्रेरणादायी ठरली. त्यांच्या चाणाक्ष बुद्धिमत्तेमुळे आणि दूरदृष्टीपूर्ण नियोजनामुळे परीक्षा प्रक्रिया अधिक सक्षम, सुरळीत आणि शिस्तबद्ध पार पडेल, असा विश्वास सर्वांमध्ये निर्माण झाला.
याच प्रसंगी Election Commission of India अंतर्गत कर्नाटक राज्यात उत्कृष्ट ई.एल.सी. (Electoral Literacy Club) कार्य राबवल्याबद्दल श्री. एम. एम. कांबळे यांचा विशेष गौरव करण्यात आला. मतदार जनजागृती आणि लोकशाही मूल्यांची जपणूक करण्यासाठी त्यांनी केलेल्या उल्लेखनीय कार्याचा सन्मान उपस्थितांच्या टाळ्यांच्या गजरात करण्यात आला.
एकूणच, ही बैठक म्हणजे प्रभावी नेतृत्व, कर्तव्यदक्षता आणि अचूक नियोजनाचा आदर्श नमुना ठरली.
जिल्हा पदवीपूर्व शिक्षणाधिकारी श्री. एम. एम. कांबळे यांच्या ठाम भूमिकेमुळे आणि शिस्तप्रिय धोरणामुळे आगामी परीक्षा अधिक पारदर्शक, निर्भेळ आणि यशस्वी होणार, याबाबत सर्वांमध्ये दृढ विश्वास निर्माण झाला. शेवटी शिक्षणाधिकारी श्री. एम. एम. कांबळे यांनी परीक्षार्थी विद्यार्थ्यांनी निर्भयपणे परीक्षेला सामोरे जावे असे भावनिक आवाहन केले.
या बैठकीचे सुत्रसंचालन प्राचार्य श्री. बंजत्री व प्राध्यापक मुल्ला यांनी केले व आभारप्रदर्शन प्राध्यापक श्री. शानवाड यांनी केले.

About Belgaum Varta

Check Also

पोलिसांच्या मार्गदर्शक सूचीचे पालन करा : पोलीस आयुक्त भूषण बोरसे यांचे आवाहन

Spread the love  बेळगाव : होळी व रंगपंचमी सणादरम्यान कायदा व सुव्यवस्थेच्या दृष्टिकोनातून शहरात चोख …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *