

किणी दहावी विद्यार्थ्यांचा निरोप समारंभ व पारितोषिक वितरण उत्साहात
कोवाड (प्रतिनिधी) : “परीक्षा ही केवळ प्रश्नपत्रिकेची नव्हे, तर विद्यार्थ्यांच्या क्षमतांची कसोटी असते. गुण मिळविणे महत्त्वाचे आहे; पण आत्मविश्वास, जिद्द आणि संस्कार ही खरी संपत्ती आहे,” असे प्रेरणादायी प्रतिपादन प्रमुख वक्ते सीमाकवी रवींद्र पाटील यांनी केले.
कर्मवीर विठ्ठल रामजी शिंदे शिक्षण मंडळ संचलित जयप्रकाश विद्यालय, किणी येथे दहावी विद्यार्थ्यांचा निरोप समारंभ व पारितोषिक वितरण सोहळा उत्साहपूर्ण वातावरणात संपन्न झाला.
कार्यक्रमाची सुरुवात सरस्वती प्रतिमेच्या पूजनाने झाली. अध्यक्षस्थानी संस्थेचे संचालक आर. बी. मनवाडकर होते. प्रमुख उपस्थितीत सचिव व्ही. आर. पाटील यांच्यासह मान्यवरांची उपस्थिती लाभली.
दीपप्रज्ज्वलन प्रमुख वक्ते सीमाकवी रवींद्र पाटील व मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले.
मुख्याध्यापक पी. जे. मोहनगेकर यांनी प्रास्ताविकात विद्यालयाच्या शैक्षणिक, क्रीडा व सांस्कृतिक प्रगतीचा आढावा घेत दहावीच्या विद्यार्थ्यांना उज्ज्वल भवितव्याच्या शुभेच्छा दिल्या.
आपल्या ओजस्वी भाषणात प्रमुख वक्ते रवींद्र पाटील पुढे म्हणाले, “वेळेचे योग्य नियोजन करा, गुणांसह गुणवंत व्हा. अपयशाला घाबरू नका; कारण अपयशच यशाच्या शिखराकडे नेणारी पहिली पायरी असते.” त्यांनी विद्यार्थ्यांना मोठी स्वप्ने पाहण्याचे आणि ती पूर्ण करण्यासाठी कठोर परिश्रम करण्याचे आवाहन केले. त्यांच्या प्रेरणादायी शब्दांनी सभागृहात उत्साहाचे वातावरण निर्माण झाले.
यावेळी कृष्णा यल्लापा गणाचारी यांनी आईच्या स्मृती प्रीतार्थ दहावीतील प्रथम पाच क्रमांक मिळविणाऱ्या विद्यार्थ्यांना बक्षिसे जाहीर केली. त्यांच्या प्रतिनिधी म्हणून सुलोचना कांबळे उपस्थित होत्या. या उपक्रमाचे सर्वांनी कौतुक केले.
शिक्षकांची मनोगते दिलीप बिर्जे यांनी व्यक्त केली. विद्यार्थ्यांपैकी जान्हवी पांडुरंग मोहनगेकर, प्राजक्ता पुंडलिक पाटील, मनस्वी पाटील व शर्वरी गणाचारी यांनी मनोगत व्यक्त करत शाळेतील आठवणींना उजाळा दिला.
पारितोषिक वितरणाचे सूत्रसंचालन व्ही. एम. बारड सर यांनी केले. अध्यक्षीय मनोगतात आर. बी. मनवाडकर यांनी विद्यार्थ्यांचे अभिनंदन करत शिक्षणासोबत संस्कार व सामाजिक बांधिलकी जपण्याचा संदेश दिला. विद्यालयाने दिलेली मूल्ये आयुष्यभर जपावीत, असे आवाहन त्यांनी केले.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन मालन कांबळे यांनी केले तर आभार प्रदर्शन पी. व्ही. सुतार सर यांनी मानले.


Belgaum Varta Belgaum Varta