बेळगाव : जिल्ह्यात अतिवृष्टी आणि महापुरामुळे उदभवू शकणाऱ्या आणीबाणीच्या प्रसंगी लोकांचे रक्षण आणि हंगामी पुनर्वसनासाठी सर्व तयारी करण्याची सूचना जिल्हाधिकारी आणि जिल्हा आपत्ती निवारण प्राधिकरणाचे अध्यक्ष महांतेश हिरेमठ यांनी अधिकाऱ्यांना केली आहे.
बेळगावात शुक्रवारी जिल्हा आपत्ती निवारण प्राधिकरणाची बैठक जिल्हाधिकारी कार्यालयाच्या सभागृहात झाली. अध्यक्षस्थानावरून बोलताना जिल्हाधिकारी हिरेमठ म्हणाले, यंदा पर्जन्यमान सामान्य असेल असा अंदाज हवामान खात्याकडून वर्तवण्यात आला आहे. तरीही आपण खबरदारी घेणे आवश्यक आहे. अधिकाऱ्यांनी हवामान खात्याच्या अहवालानुसार कामाची रूपरेषा आखून कर्तव्य बजावले पाहिजे. यावेळीही कामाच्या दृष्टीने पथके नेमण्यात येतील. कामाच्या जबाबदारीच्या अनुषंगाने यादी करून समग्र माहिती असलेली पुस्तिका तयार करून ती सर्व तालुक्यांच्या अधिकाऱ्याना देण्याची सूचना जिल्हाधिकाऱ्यांनी केली. गेल्या वेळेप्रमाणे पूरग्रस्तांसाठी आधारकेंद्रे उभारण्यात येतील. त्याचप्रमाणे बोटींची सुद्धा व्यवस्था करण्यात येईल. नदीतीरावरील लोकांना खबरदारीचा उपाय म्हणून सुरक्षित स्थळी हलविण्यासाठी वाहतुकीची व्यवस्था करण्याची सूचना जिल्हाधिकाऱ्यांनी केली. आणीबाणीच्या स्थितीत भरपाई आणि पुनर्वसनासाठी दिवसाचे २४ तास सुरु राहील अशी कंट्रोल रूम सुरु करण्याची सूचना त्यांनी केली. अतिवृष्टी आणि महापुरानंतर साथीचे रोग पसरण्याचा धोका असतो.
त्यासाठी आवश्यक औषधांचा साठा करून ठेवण्याचे निर्देश त्यांनी आरोग्य अधिकाऱ्यांना दिले. नद्यांची पात्रे आणि शहरी भागात नाले-ओढ्यांची सफाई करण्याची सूचना त्यांनी संबंधित अधिकाऱ्यांना दिली. बळ्ळारी नाल्यामुळे बेळगाव परिसरात अनेक समस्या निर्माण होत आहेत. अधिकाऱ्यांनी त्यावर तातडीने उपाययोजना करण्याची सूचना केली.
जि. पं. सीईओ दर्शन एच. व्ही., अपर जिल्हाधिकारी अशोक दुडगुंटी, डीसीपी डॉ. विक्रम आमटे, चिक्कोडीचे प्रांताधिकारी युकेशकुमार, मनपा आयुक्त जगदीश के. एच. यांच्यासह बांधकाम, पोलीस, अग्निशमन दल, आरोग्य, पशुपालन, होमगार्ड्स यांच्यासह विविध खात्यांचे अधिकारी उपस्थित होते.
Check Also
सौंदती रेणुकादेवी यात्रेत सोयी सुविधा उपलब्ध करून द्या
Spread the love कोल्हापूर जिल्हा रेणुका भक्त संघटनेचे प्रशासनाला साकडे बेळगाव : पुढील महिन्यात १२ …