आमदार राजेश पाटील यांनी केलेल्या मागणीनुसार मंत्रालयात झाली बैठक
चंदगड (ज्ञानेश्वर पाटील) : चंदगड व आजरा तालुक्यातील आरोग्याची व्यवस्था सक्षम करण्यासाठी सदरच्या ग्रामीण रुग्णालयाची क्षमता वाढविण्याचा निर्णय आरोग्य विभागामार्फत करण्यात येईल, असे राज्याचे आरोग्य राज्यमंत्री राजेंद्र पाटील- यड्रावकर यांनी सांगितले. चंदगड व आजरा ग्रामीण रुग्णालयासंदर्भात मंत्रालयात आमदार राजेश पाटील यांनी केलेल्या मागणीनुसार मंगळवारी (दि. ८ जून रोजी) आरोग्य विभागाच्या अधिकाऱ्यांशी मंत्रालयात बैठक घेतली. यावेळी आमदार राजेश पाटील उपस्थित होते.
तसेच चंदगड व आजरा तालुक्यातील नागरिकांना आरोग्यासाठी आवश्यक असणारी सेवा व त्यासाठी लागणारे कर्मचारी आपण आरोग्य विभागामार्फत देऊ असे आश्वासनही यावेळी मंत्री यड्रावकर यांनी दिले.
आरोग्य राज्यमंत्री राजेंद्र पाटील-यड्रावकर यांनी आजरा व चंदगड तालुक्यातील ग्रामीण रुग्णालयाचे 30 बेडवरून 50 बेडचे करण्याबाबत आमदार राजेश पाटील यांनी केलेल्या मागणीनुसार आरोग्य अधिकारी यांच्याशी चर्चा केली. सदर बैठकीमध्ये आजरा तालुक्यातील ग्रामीण रुग्णालयाचा प्रस्ताव सर्व बाबतीत पूर्ण शासनाकडे मंजुरी करिता पाठवण्यात आल्याचे सांगण्यात आले. त्याचबरोबर चंदगड तालुक्यातील प्रस्तावामधील काही त्रुटी असल्याकारणाने सदरच्या त्रुटींच्या पुर्तता करून परिपूर्ण प्रस्ताव मान्यतेसाठी सरकारकडे पाठवण्यास संबधित आरोग्य विभागाच्या अधिकाऱ्यांना सूचित केले.