तेऊरवाडी (एस. के. पाटील) : गेल्या दोन दिवसांपासून चंदगड तालुक्यात पडलेल्या सरासरी 261 मिलिमीटर पावसामुळे पूरस्थिती गंभीर बनली असून तालुक्यातील कोवाड बाजारपेठेला सलग तिसऱ्या वर्षी पुराच्या पाण्याचा विळखा घट्ट होताना दिसत आहे. बचाव पथकाने१५ कुटुंबियाना आज स्थलांतरीत केले.
कालच्या दिवसभरात पडलेल्या पावसामुळे संपूर्ण बाजारपेठ पाण्याखाली गेली असून कर्यात भागातील इतर गावाचा संपर्क तुटला आहे. येथील निट्टूर रोड, नेसरी रोडसहित नदीपलीकडील बेळगाव रोड पाण्याखाली गेले असून बाजारपेठेतील संपूर्ण दुकानांच्या पहिल्या मजल्यामध्ये पुराचे पाणी शिरले आहे.
संभाव्य धोका ओळखून गुरुवारी कोवाड येथील बाजारपेठेला गडहिंग्लज उपविभागाच्या प्रांताधिकारी श्रीमती विजया पांगारकर यांनी याठिकाणी भेट देऊन व्यापारी तसेच नदीकाठावरील गावातील नागरिकांना सतर्कतेचा इशारा दिला होता. तरीदेखील वाढत्या पुराच्या पाण्याचा अंदाज न आल्याने काही नागरिक हे नेसरी रोड व नदीपलीकडील कागणी रोड वरील इमारतीमध्ये अडकून पडले होते. त्यामुळे पांगारकर यांच्या सूचनेवरून याठिकाणी गडहिंग्लज येथील बचावकाऱ्याची टीम दाखल होऊन या ठिकाणावरील नागरिकांना महसूल प्रशासन व पोलीस प्रशासन यांच्या सहकार्याने सुरक्षित स्थळी हलविण्यात यश आले. जवळपास चार तासाच्या अथक प्रयत्नाने सर्व नागरिकांची सुखरूप सुटका करण्यात आली.
त्याचबरोबर कर्यात भागातील अनेक मार्ग हे जलमय झाले असून अनेक ओढे तसेच नाल्यांचे पाणी रस्त्यावर आल्यामुळे या मार्गावरील वाहतूक खंडित झाली आहे. याच पथकाने महावितरण
कर्मचाऱ्यांचा सहाय्याने निट्टूर रोडवर जाऊन विद्युत पुरवठा सुरळीत केला. या मोहिमेमध्ये कोवाड पोलिस औट पोस्टचे हे. कॉ. कुशाल शिंदे, अमर सायनेकर, तलाठी दिपक कांबळे यांच्यासह आपदा टिम सहभागी झाले होते.
Check Also
चंदगडमध्ये डॉ. नंदा बाभूळकर यांच्या उमेदवारीला मविआतील नेत्यांचा विरोध
Spread the love गडहिंग्लज : चंदगड विधानसभा मतदारसंघामध्ये इच्छुकांची संख्या वाढल्याने उमेदवारीसाठी रस्सीखेच सुरू असताना …