चंदगड (ज्ञानेश्वर पाटील) : एलआयसी विमा या क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी केल्याबद्दल कोल्हापूर विभागातील गडहिंग्लज शाखेचे विमा प्रतिनिधी नामदेव धोंडीबा पत्ताडे यांना नुकताच ‘ऑगस्ट क्रांती पुरस्काराने’ सन्मानित करण्यात आले. नामदेव पत्ताडे हे चंदगड तालुक्यातील विंझणे या गावचे विमा प्रतिनिधी म्हणून मागील १० वर्षांपासून काम करत असताना, त्यांनी गाव-खेड्यातील लोकांना विम्याचे महत्त्व, बचतीची सवय, विम्यामुळे कुटुंब कसे सुरक्षित राहू शकते, आदी लोकांना पटवून देत जनजागृती केली. तसेच अशिक्षित व गरजू लोकांना नेहमीच मदतीचा हात पुढे केला.
श्री. नामदेव पत्ताडे हे पंचक्रोशीत एक विश्वासू विमा प्रतिनिधी म्हणून ओळखले जात आहेत. विमा म्हटले की, लोंकाची उदासीनता पाहायला मिळते, परंतु नामदेव पत्ताडे यांनी विम्याबद्दल समाजात विश्वासार्हता निर्माण केली. याआधी त्यांना कोल्हापूर भूषण, कॉर्पोरेट ट्रॉफी, अक्षय करंडक, कोल्हापूर IPL, बीमारत्न इत्यादी पुरस्कार मिळाले आहेत.
नामदेव पत्ताडे यांना त्यांच्या सहकारी वर्गाकडून मोलाचे सहकार्य लाभले. गडहिंग्लज शाखेचे शाखा अधिकारी दिलीप मोरे, किरण औचिते, सदानंद गायकवाड, श्री. सोनावणे, कृष्णा यादव तसेच संपूर्ण टीमने चांगले सहकार्य केले. एकंदरीत नामदेव पत्ताडे यांना हा पुरस्कार मिळाल्यामुळे त्यांचे सर्व स्तरातून कौतुक होत आहे.
अधिकाधिक गावे आणि संपूर्ण कुटुंबे विम्याच्या छताखाली आणून सुरक्षित करण्याचे आवाहन नामदेव पत्ताडे यांनी केले आहे.