चंदगड (ज्ञानेश्वर पाटील) : कोल्हापूर रेड अलर्टमध्ये असणाऱ्या चंदगड तालुक्यांतील कित्येक भागांमध्ये जोरदार पावसामुळे सर्वत्र पूरसदृश्य अवस्था झाली असून काही ठिकाणी अतिवृष्टीमुळे शेतकऱ्यांच्या शेतीचे नुकसान झाले आहे.
माळी ते खळणेकरवाडी रस्त्यावर डोंगरातून येणारा सुकाहळ्ळा येथे अतिवृष्टीमुळे शेतातील ओढ्यामधून जोरदार पानीप्रवाह वाहल्याने तेथील शेतकऱ्यांच्या पिकाचे नुकसान झाले आहे. हा ओढा कमी उंचीचा असल्याने तो पूर्ण क्षमतेने भरल्याकारणाने जवळचे शेतकरी पांडुरंग घट्टापा गावडे व इतर शेतकरी यांच्या शेताचे व जमिन खचल्यामुळे शेतातील नाचणी व भात पिकाचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे.
यामुळे रस्त्यावर माती व दगड जमा होऊन मुख्य रस्त्यापासून खळणेकरवाडी गावाचा संपर्क तुटला आहे. आज सकाळच्या सुमारास निसर्गाचे हे रौद्ररूप पाहायला मिळाले. या अतिवृष्टीमुळे शेतजमिनी, पिकांचे आणि रस्त्याचे नुकसान झाले आहे. पिकांच्या नुकसानीचे पंचनामे कृषी विभाग, वन विभाग, महसुल विभाग व ग्रामपंचायतने तात्काळ पंचनामे करावेत व झालेल्या नुकसानीची भरपाई व विस्कळीत झालेली दळण-वळण व्यवस्था पुर्ववत करावी अशी मागणी येथील ग्रामस्स्थांकडून होत आहे.